‘लोकसत्ता लोकांकिका’ची पुणे विभागीय अंतिम फेरी आज रंगणार

‘लोकसत्ता लोकांकिका’ची पुणे विभागीय अंतिम फेरी मंगळवारी (११ डिसेंबर) रंगणार आहे. भरत नाटय़ मंदिर येथे होणाऱ्या विभागीय अंतिम फेरीत सवरेत्कृष्ट ठरलेली एकांकिका मुंबईतील महाअंतिम फेरीत पुण्याचे प्रतिनिधित्व करणार असल्याने सहा एकांकिकांना दमदार सादरीकरणातून आपली दावेदारी सिद्ध करावी लागेल.

महाविद्यालयीन तरुणांच्या सर्जनशीलतेला, अभिव्यक्तीला ‘लोकसत्ता लोकांकिका’च्या रूपाने गेली काही वर्षे हक्काचे व्यासपीठ मिळाले. या स्पर्धेला विद्यार्थ्यांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे. वैविध्यपूर्ण आशय विषय, नावीन्यपूर्ण आणि प्रायोगिक पद्धतीची मांडणी, कसदार लेखन आणि अभिनयामुळे विद्यार्थ्यांनी लोकांकिका गाजवली आहे. सामाजिक-राजकीय परिस्थितीवर थेट भाष्य करत विद्यार्थ्यांनी आपले सामाजिक भानही दाखवून दिले आहे. म्हणूनच लोकांकिका ही राज्याच्या नाटय़विश्वात महत्त्वाची स्पर्धा ठरते.

यंदा पुणे विभागीय अंतिम फेरीत सहा एकांकिका सादर होणार आहेत. गतवर्षी बृहन् महाराष्ट्र वाणिज्य महाविद्यालयाने महाअंतिम फेरीत स्थान मिळवून नंतर राज्यात पहिला क्रमांकही पटकावला होता. त्यामुळे यंदा पुण्याच्या एकांकिकांवर विशेष लक्ष आहे. महाअंतिम फेरीत मुंबई, पुणे, औरंगाबाद, नागपूर, नाशिक, कोल्हापूर, रत्नागिरी, ठाणे या केंद्रांवरील सवरेत्कृष्ट एकांकिका सादर होणार आहेत. या पाश्र्वभूमीवर, पुण्यातील विभागीय अंतिम फेरी चुरशीची होणार आहे.

विनामूल्य प्रवेशिका भरत नाटय़ मंदिर येथे

अंतिम फेरीच्या विनामूल्य प्रवेशिका मंगळवारी दुपारी साडेतीनपासून भरत नाटय़ मंदिर येथे प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या तत्त्वावर दिल्या जाणार आहेत. त्यामुळे नाटय़प्रेमी पुणेकरांनाही विभागीय अंतिम फेरीतील दमदार एकांकिकांचे साक्षीदार होण्याची संधी मिळेल.

अंतिम फेरीत सादर होणाऱ्या एकांकिका

फग्र्युसन महाविद्यालय (आशा), बृहन् महाराष्ट्र वाणिज्य महाविद्यालय (दोन पंथी), आबासाहेब गरवारे महाविद्यालय (अंधार), मराठवाडा मित्रमंडळाचे वाणिज्य महाविद्यालय (अफसाना), मॉडर्न महाविद्यालय, गणेशखिंड (फेरीटेल), स. प. महाविद्यालय (बातमी क्रमांक एक करोड एक)

प्रायोजक

सॉफ्ट कॉर्नर प्रस्तुत केसरी टूर्स आणि पितांबरी सहप्रायोजित आणि पॉवर्ड बाय इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड यांच्या सहकार्याने ‘लोकसत्ता लोकांकिका २०१८’ स्पर्धा सुरू आहे. या स्पर्धेचे टॅलेन्ट हंड पार्टनर आयरिश प्रोडक्शन असून एरेना मल्टीमीडिया हे स्पर्धेचे नॉलेज पार्टनर आहेत. अस्तित्वच्या सहकार्याने रंगणाऱ्या ‘लोकसत्ता लोकांकिका’ स्पर्धेसाठी झी मराठी हे टेलिकास्ट पार्टनर आणि एबीपी माझा हे न्यूज पार्टनर आहेत.