वीजबिल भरूनही वीजपुरवठा खंडित करणे किंवा कायद्याने नोटीस न देताच वीज तोडण्याच्या कारवाईतून अनेक वीजग्राहकांना मनस्ताप सहन करावा लागत असतानाच ‘महावितरण’च्या भोंगळ कारभाराचा फटका ज्येष्ठ पर्यावरण शास्त्रज्ञ डॉ. माधव गाडगीळ यांनाही बसला. त्यांच्या नावे असलेल्या वीजजोडाचे बिल आगाऊ भरले असतानाही त्यांना वीजजोड तोडण्याची नोटीस देण्यात आली असून, त्यांच्या पत्नीच्या नावे असलेल्या वीजजोडाचे बिल भरले असतानाही कोणतीही नोटीस न देता वीजपुरवठा खंडित करण्याचा ‘उद्योग’ महावितरणने केला आहे.
डॉ. गाडगीळ हे पाषाण भागातील स्प्रिंग फ्लॉवर्स इमारतीत राहतात. त्यांच्या सदनिकेच्या वीजजोडाचे फेब्रुवारीचे बिल त्यांना पाठविण्यात आले होते. मात्र, त्यांनी आगाऊ भरलेल्या रकमेपैकी सहा हजारांहून अधिक रुपये महावितरणकडे शिल्लक असल्याने त्यातून बिलाची रक्कम वजा करण्यात आली होती. त्यामुळे त्यांच्याकडे कोणत्याही पद्धतीची बिलाची थकबाकी नव्हती. असे असतानाही त्यांना वीजबिलाच्या थकबाकीसाठी वीजपुरवठा तोडण्याची नोटीस बजावण्यात आली आहे.
डॉ. गाडगीळ यांच्या पत्नीच्या नावे याच इमारतीत दुसऱ्या सदनिकेत वीजजोड आहे. त्याचे वीजबिल ८ मार्चला ऑनलाईन पद्धतीने भरण्यात आले होते. मात्र, बिल थकीत असल्याचे सांगून महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी शनिवारी या सदनिकेचा वीजपुरठा खंडित केला. विशेष म्हणजे हा वीजपुरवठा तोडण्यापूर्वी या प्रकरणात कायद्यानुसार कोणतीही नोटीस देण्यात आली नव्हती व घरात कुणी नसताना ही कारवाई करण्यात आली. या दोन्ही प्रकरणांत महावितरणच्या भोंगळ कारभारामुळे डॉ. गाडगीळ यांना मनस्ताप सहन करावा लागला. बिल भरले असल्याने तोडलेला वीजपुवठा पूर्ववत करण्याची मागणी गाडगीळ यांच्या पत्नीने महावितरणकडे केली असली, तरी रविवारी संध्याकाळपर्यंत पुरवठा सुरळीत झाला नव्हता.