महावितरण कंपनीच्या गणेशखिंड येथील प्रकाश भवन या कार्यालयात लाचखोरीचा अंधार असल्याचे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सोमवारी उघडकीस आणले. मीटर रिडिंगच्या कंत्राटाची फाइल पुढील मंजुरीसाठी पाठविण्यासाठी संबंधित कंत्राटदाराकडून २० हजारांची लाच स्वीकारताना महावितरणच्या वित्त व लेखा विभागाच्या वरिष्ठ व्यवस्थापकाला सोमवारी रंगेहात पकडण्यात आले.
मधुर शंकर सावंतराव (रा. माउली निवास, एम. एस. काटे चौक, सांगवी) असे लाचखोरीत पकडलेल्या वरिष्ठ अधिकाऱ्याचे नाव आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांनी याबाबतची माहिती दिली. या प्रकरणात तक्रार देणाऱ्या कंत्राटदाराचे महावितरण कंपनीमध्ये मीटर रिडिंगचे कंत्राट आहे. या कंत्राटाचे लेखापरीक्षण होऊन संबंधित फाइल मान्यतेसाठी पुढे पाठविण्यासाठी सावंतराव यांच्याकडे आली होती. लेखापरीक्षण करून फाइल पुढे पाठविण्यासाठी सावंतराव यांनी संबंधित कंत्राटदाराकडे वीस हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती.
लाचेची मागणी झाल्यामुळे कंत्राटदाराने याबाबत सोमवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली. त्यामुळे लगेचच सापळा लावण्यात आला. महावितरणच्या प्रकाश भवन येथील कार्यालयामध्ये संबंधित तक्रारदाराकडून २० हजार रुपयांची लाच घेताना सावंतराव यांना रंगेहात पकडण्यात आले. त्यानुसार त्यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे. सावंतराव हे श्रेणी एकचे अधिकारी असून, सुमारे अडीच वर्षांपूर्वी ते पुण्यामध्ये संबंधित पदावर रुजू झाले आहेत.