‘भारताच्या तुलनेत अमेरिकेत एक चतुर्थाश शिक्षण संस्था आहेत. मात्र, त्या संस्थांबरोबर स्पर्धा करू शकतील अशा शिक्षणसंस्था भारतात अगदी बोटावर मोजण्याइतक्याच आहेत. भारतात उच्च शिक्षणाची संख्यात्मक वाढ झाली असली, तरी शिक्षणव्यवस्था शिक्षकांची अपुरी संख्या, आर्थिक समस्या यांनी घेरलेली आहे. त्याचा परिणाम गुणवत्तेवर होत आहे,’ अशी टीका भारतीय अवकाश संशोधन संस्थेचे (इस्रो) अध्यक्ष ए. एस. किरण कुमार यांनी सोमवारी केली.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या १०८ व्या पदवीदान समारंभात किरण कुमार बोलत होते. यावेळी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. वासुदेव गाडे, कुलसचिव डॉ. नरेंद्र कडू, परीक्षा नियंत्रक डॉ. अशोक चव्हाण आदी उपस्थित होते. यावेळी ६१ विद्यार्थ्यांना सुवर्णपदक, ४०५ विद्यार्थ्यांना पीएचडी आणि ८८ हजार ३०६ विद्यार्थ्यांना पदवी, पदविका प्रमाणपत्रे देण्यात आली.
यावेळी किरण कुमार म्हणाले, ‘‘देशाच्या विकासात उच्च शिक्षणाचा मोठा वाटा आहे. मात्र, भारतात त्याकडे अधिक गांभीर्याने पाहण्याची आवश्यकता आहे. भारतातल्या ३३ हजार शिक्षणसंस्थांपैकी अमेरिकेतील ४ हजार शिक्षणसंस्थांशी स्पर्धा करू शकतील अशा संस्था बोटावर मोजण्याइतक्या आहेत. जगातील सर्वोत्तम विद्यापीठांच्या यादीत पहिल्या पाचशे विद्यापीठात अमेरिकेतील ९७ विद्यापीठे आहेत. मात्र, भारतातल्या फक्त ६ संस्था आहेत. आपल्याकडील विद्यापीठांमध्ये कुशल मनुष्यबळ नाही. शिक्षकांची कमतरता आहे. आर्थिक समस्या आहेत, या त्रुटींचे परिणाम उच्च शिक्षण व्यवस्थेवर होत आहेत.’’ ‘पदवी मिळाली, तरीही आपली कौशल्ये विकसित करण्यासाठी, क्षमता वाढवण्यासाठी सातत्याने प्रयत्न करा आणि विश्वासाने बाहेरच्या जगात पाऊल ठेवा,’ असा उपदेश त्यांनी विद्यार्थ्यांना केला.
विद्यापीठाचे अव्यवस्थापन आणि गर्दी
पदवीदान समारंभाला विद्यापीठाच्या आवारात गर्दी होणे तसे नवीन नाही. मात्र, या वर्षी गर्दीचा अंदाज घेऊन व्यवस्थापन करण्यास विद्यापीठ असमर्थ ठरल्याचेच चित्र पदवीदान समारंभांत पाहायला मिळाले. प्रमाणपत्रे घेण्यासाठी एका ठिकाणी गर्दी होऊ नये, यासाठी वेगवेगळ्या विभागांमध्ये प्रमाणपत्रांचे वाटप ठेवण्यात आले होते. मात्र, तरीही वाटपात गोंधळच झाला. अभियांत्रिकीच्या प्रमाणपत्रांचे वाटप मध्येच थांबवावे लागले. प्रमाणपत्रांमध्ये चुका झाल्यामुळे या वर्षी अनेक विद्यार्थ्यांना लॅमिनेटेड प्रमाणपत्रे मिळू शकली नाहीत. त्यामुळेही विद्यार्थी नाराज होते. नावात, पदव्यांमध्ये चुका असल्याच्या तक्रारीही विद्यार्थ्यांकडून करण्यात येत होत्या.