जिल्हा प्रशासनाकडून आषाढी वारीसाठी मोबाईल अ‍ॅप

पंढरपूर आषाढी वारीसाठी लाखो वारकरी येतात. यंदा या पालखी सोहळ्याचे व्यवस्थापन, सुविधा आणि सूचनांसाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडून ‘पालखी सोहळा २०१७’ हे मोबाईल अ‍ॅप विकसित करण्यात आले आहे. या अ‍ॅपद्वारे पंढरपुरातील विठ्ठल-रखुमाईच्या मूर्तीचे चोवीस तास लाइव्ह दर्शन घेता येणार आहे. या अ‍ॅपचे उद्घाटन पालकमंत्री गिरीश बापट यांच्या हस्ते शनिवारी करण्यात आले. हे अ‍ॅप १२ जूनपासून प्ले स्टोअरवरून डाउनलोड करता येईल.

पंढरपूर पालखी सोहळ्याच्या नियोजनाची आढावा बैठक शनिवारी सकाळी विधानभवन येथे आयोजित करण्यात आली होती. पालकमंत्री गिरीश बापट, सोलापूरचे पालकमंत्री विजय देशमुख, विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी, जिल्हाधिकारी सौरभ राव, सातारच्या जिल्हाधिकारी श्वेता सिंघल, सोलापूरचे जिल्हाधिकारी आर. बी. भोसले, खासदार अमर साबळे, आमदार बाळा भेगडे, पिंपरी-चिंचवडचे महापौर नितीन काळजे, पुणे महापालिका आयुक्त कुणाल कुमार, कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील, उपअधीक्षक ज्योती सिंग, संत तुकाराम महाराज संस्थान, देहूचे अध्यक्ष बाळासाहेब मोरे, ज्ञानेश्वर महाराज संस्थान आळंदी कमिटीचे विश्वस्त अजित कुलकर्णी या वेळी उपस्थित होते. येत्या १६ जून ते ९ जुलै दरम्यान पार पडणाऱ्या पंढरपूर आषाढी वारीसाठी तयार करण्यात आलेल्या या अ‍ॅपद्वारे कोणालाही तक्रार, सूचना आणि मदत मिळू शकणार आहे. पाण्याचे टँकर, आरोग्य सेवा, धान्य, रॉकेल, सिलिंडर पुरवठा आदी सुविधा दिल्या जाणार आहेत. तसेच विठ्ठल-रखुमाईच्या मूर्तीचे लाईव्ह दर्शन घेता येणार आहे. हरवलेल्या व्यक्तींचा शोध या अ‍ॅपद्वारे घेता येणार असून देहू, आळंदी, पंढरपूर देवस्थान विश्वस्त, पालखी सोहळा प्रमुख, दिंडी प्रमुख, जिल्हाधिकारी, सर्व तहसीलदार, आरोग्य केंद्रे, नियंत्रण कक्ष इत्यादींचे क्रमांक उपलब्ध करून देण्यात आले आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी दिली.

पालखी मार्गावरील अतिक्रमणे काढा- पालकमंत्री

भाविक आणि वारकरी पालखी सोहळ्यात मोठय़ा संख्यने येतात. त्यामुळे स्वच्छता, सुरक्षितता आणि शिस्त या तीन मुद्दय़ांवर वारी व पालखी सोहळ्याचे नियोजन करण्यात येत आहे. वारीतील वाहतूक व्यवस्था उत्तम राहील यासाठी संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्याच्या मार्गावर असलेली अतिक्रमणे काढून टाकावीत. जेणेकरून पालखी मार्ग मोकळा होऊन वारकऱ्यांना वारीच्या काळात कोणताही त्रास होणार नाही, अशा सूचना पालकमंत्री गिरीश बापट यांनी शनिवारी प्रशासनाला दिल्या.  वारीच्या कालावधीत स्वच्छता आणि वारकऱ्यांना पाणी उपलब्ध होण्यासाठी संबंधित व्यवस्थांनी नियोजन करावे, वारीत सहभागी होणाऱ्या िदडय़ांना गॅस सिलेंडर, केरोसीनचा पुरवठा वेळेत करावा, तसेच दोन्ही पालख्यांचा मुक्काम असणाऱ्या ठिकाणी अखंडित वीजपुरवठा राहण्यासाठी तीनही जिल्हाधिकाऱ्यांनी आपापल्या कार्यक्षेत्रातील अधिकाऱ्यांना सूचना द्याव्यात, असेही बापट यांनी सांगितले.