व्यवस्थापन अभ्यासक्रम (एमबीए, एमएमएस) चालवणाऱ्या संस्थांवर यावर्षीही संक्रांतच असून, व्यवस्थापन अभ्यासक्रमांची जेवढी प्रवेश क्षमता आहे, तेवढेही प्रवेश अर्ज परीक्षेसाठी आलेले नाहीत. परीक्षाअर्ज भरण्याचा शुक्रवार (१४ फेब्रुवारी) हा शेवटचा दिवस असताना गुरुवापर्यंत ४५ हजार जागांसाठी फक्त ३४ हजार २०० विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी अर्ज केले आहेत.
व्यवस्थापन अभ्यासक्रमांसाठी विद्यार्थी मिळत नसल्याचेच गेल्या दोन वर्षांपासून दिसत आहे. मात्र, यावर्षी व्यवस्थापन अभ्यासक्रम चालवणाऱ्या संस्थांची परिस्थिती अधिकच गंभीर होण्याची चिन्हे दिसत आहेत. विद्यार्थ्यांच्या घटत्या प्रतिसादामुळे व्यवस्थापन अभ्यासक्रम चालवणाऱ्या संस्था बंद करण्यास गेल्यावर्षांपासूनच सुरूवात झाली आहे. परिणामी गेल्यावर्षीच्या तुलनेत प्रवेश क्षमतेत घट झाली आहे. गेल्यावर्षी व्यवस्थापन अभ्यासक्रमाची प्रवेश क्षमता साधारण ४८ हजार इतकी होती, तर यावर्षी राज्यात व्यवस्थापन शास्त्राच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी साधारण ४५ हजार प्रवेश क्षमता आहे. मात्र, तरीही महाविद्यालयांना विद्यार्थी शोधावे लागणार असल्याचे दिसत आहे. त्याचप्रमाणे सध्या न्यायालयाच्या निकालाच्या प्रतीक्षेत असणाऱ्या पिजीडिबीएम म्हणजे पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रम चालवणाऱ्या संस्थांचीही भर पडण्याची शक्यता आहे. तसे झाल्यास एकूण प्रवेश क्षमतेमध्ये साधारण २० हजार जागांची भर पडणार आहे.
व्यवस्थापन अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया यावर्षी राज्य स्तरावर सामाईक प्रवेश परीक्षा (सीईटी) घेऊन करण्यात येणार आहे. सामाईक प्रवेश परीक्षेचे अर्ज भरण्यासाठी शुक्रवार (१४ फेब्रुवारी) अंतिम मुदत आहे. मात्र, यावर्षी ४५ हजार जागांसाठी प्रवेश परीक्षेचे अर्ज फक्त ३४ हजार २०० आले आहेत. दर दिवसाची येणाऱ्या अर्जाची सरासरी संख्या पाहता, शेवटच्या दिवशी एक ते दीड हजार अर्जाचीच भर पडण्याची शक्यता आहे. आलेल्या अर्जामधून प्रत्यक्ष परीक्षेला बसणारे विद्यार्थी, त्यानंतर परीक्षेत पात्र ठरणारे विद्यार्थी आणि मग प्रत्यक्ष प्रवेश घेणारे विद्यार्थी अशी गाळणी लागणार आहे. त्यामुळे प्रत्यक्ष प्रवेश घेण्याच्या प्रक्रियेपर्यंत पोहोचणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाण अत्यल्प असण्याची शक्यता आहे.