सभेचे मांडव, रिक्षा, फलक, ध्वनिक्षेपक यंत्रणा, चहापान, भोजनावळी.. प्रचाराच्या दरम्यान यासह विविध गोष्टी व यंत्रणा पुरविणाऱ्या मंडळींकडून आता उमेदवारांकडील उधारीच्या वसुलीची लगबग सुरू करण्यात आली आहे.. निवडणूक झाल्यानंतर किंवा निकाल लागल्यानंतर थकीत बिले मिळण्यासाठी करावी लागणारी कसरत व संबंधित उमेदवार पराभूत झाला, तर काही वेळेला बिले मिळण्याची आशाच सोडून द्यावी लागत असल्याचा पूर्वानुभव असल्याने प्रचार संपताच बिलांच्या वसुलीचे प्रयत्न सुरू झाले आहेत.
मतदारसंघातून निवडणुकीचा प्रचार करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या सर्व गोष्टी आता भाडय़ाने किंवा विकत आणल्या जातात. बहुतांश प्रचार फेऱ्या किंवा सभांनाही माणसे ‘पुरविली’ जातात, हेही आता उघड आहे. पण, ही माणसे ‘प्रीपेड’ असल्याने त्या दिवसांचा हिशेब तिथल्या तिथे संपतो. उमेदवाराच्या बरोबर फिरणारे अनेक कार्यकर्तेही फुकटात नसतात. त्यांनाही प्रचार सुरू होण्यापूर्वी किंवा प्रचाराच्या दरम्यान त्याचा हिशोब मिळालेला असतो. मात्र, प्रचारासाठी वापरण्यात येणारी वाहने, फलक, सभांचे मांडव, पत्रके, ध्वनिक्षेपक यंत्रणा, कार्यकर्त्यांच्या भोजनांसाठी असणारी केटरींग व्यवस्था किंवा हॉटेल आदींची काही बिले अनेकदा थकीत ठेवली जातात. प्रचाराच्या दरम्यानची बिले एकदमच दिली जातील, असे सांगितले जाते.
यंत्रणा पुरविणाऱ्या संबंधित व्यक्तीचाही खर्च होत असल्याने लवकरात लवकर बिले कशी मिळतील, याकडे अनेकांचे लक्ष असते. जाहीर प्रचार संपल्यानंतर प्रचारातील बहुतांश यंत्रणांची कामे संपतात. त्यामुळे थकीत बिले घेण्याकडे अनेकांचा कल असतो. मतदान होण्यापूर्वीच बिले हातात पाडून घेण्याचा अनेकांचा प्रयत्न असतो. त्यामुळे सोमवारी संध्याकाळी सहाला प्रचार संपल्यानंतर या बिलांच्या वसुलीचे प्रयत्न सुरू करण्यात आले.
एका हॉटेल व्यावसायिकाने सांगितले,की उमेदवाराने सांगून ठेवले असल्याने त्यांच्याकडून येणाऱ्या मागणीनुसार भोजन पुरविले जाते. बिले लिहून ठेवली जातात व ती निवडणुकीच्या निकालापूर्वी वसूल करण्याकडे आमचा कल असतो. मागील एका निवडणुकीत एका उमेदवाराकडे तीस ते चाळीस हजारांचे बिल थकीत होते. निवडणुकीत हा उमेदवार पडला. त्यामुळे त्या बिलाच्या वसुलीसाठी मोठी कसरत करावी लागली. अनेकदा निवडणुकीतील हा उधारीचा ग्राहक आम्हाला नको असतो, पण त्याच्याच विभागात व्यवसाय असल्याने सेवा पुरवावी लागते.