दिल्लीतील ‘नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा’च्या (एनएसडी) धर्तीवर महाराष्ट्रातही ‘एमएसडी’ सुरू करण्याचा मानस नाटय़परिषदेने व्यक्त केला. मात्र, अद्याप त्यास मुहूर्त लाभला नसल्याने परिषदेचा हा संकल्प हवेतच राहिला आहे.
नाटय़परिषदेच्या पिंपरी-चिंचवड शाखेच्या वर्धापननिमित्त आयोजित कार्यक्रमासाठी नाटय़ परिषदेचे अध्यक्ष मोहन जोशी दोन वर्षांपूर्वी चिंचवडला आले होते. तेव्हा नाटय़परिषदेच्या आगामी काळातील कामांचे नियोजन सांगताना हा संकल्प केला होता. राज्याचे वनमंत्री पतंगराव कदम, नाटय़ परिषदेचे मुख्य कार्यवाह दीपक करंजीकर, सहकार्यवाह भाऊसाहेब भोईर आदी उपस्थित होते. नाटय़परिषदेच्या माध्यमातून कलावंतांसाठी, नाटय़क्षेत्रासाठी भरीव काम करण्याचा मानस आहे. ‘एनएसडी’च्या संचालकपदी वामन केंद्रे यांच्या निवडीचा अभिमान वाटत असल्याचे सांगून ‘एनएसडी’च्या धर्तीवर महाराष्ट्रात कला अकादमी सुरू करण्याचा विचार आहे व त्यासाठी सरकारने पाच एकर भूखंड द्यावा, असे आवाहन त्यांनी केले होते. ‘एमएसडी’चे काम तसे मोठे आहे. मात्र, नाटय़परिषदेची तितकी क्षमता आहे, असा आत्मविश्वास जोशी यांनी व्यक्त केला होता. पतंगरावांनी तेव्हा राज्य शासनाच्या पातळीवर सहकार्य करू, असे आश्वासन दिले होते. पुढे सत्तांतर झाले. नाटय़परिषदेतही बऱ्याच घडामोडी झाल्या. त्यात महाराष्ट्रात कलाअकादमी सुरू करण्याच्या दृष्टीने पुढे ठोस असे काही झाले नाही. या संदर्भात, बैठका सुरू आहेत आणि विविध स्तरावर बोलणी सुरू आहेत, अशी प्रतिक्रिया भोईर यांनी दिली.