नियुक्तीद्वारे मुख्यमंत्र्यांचा अजित पवारांना शह
माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे खास विश्वासू असलेले अधिकारीच पिंपरी महापालिकेत आयुक्त म्हणून रूजू होतात, ही गेल्या काही वर्षांपासूनची परंपरा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोडीत काढली आहे. आपल्या खास मर्जीतील व नागपूर ‘होमटाऊन’ असलेल्या दिनेश वाघमारे यांची मुख्यमंत्र्यांनी पिंपरी पालिकेत वर्णी लावली आहे. यापूर्वी, नवी मुंबई महापालिकेच्या निवडणुका तोंडावर असताना तेथे वाघमारे यांची पाठवणी करण्यात आली होती. त्याचपद्धतीने, आठ महिन्यानंतर पिंपरीत निवडणुका असताना वाघमारे यांना शहरात आणण्यात आले आहे. दोन्हीकडे राष्ट्रवादीचीच सत्ता होती, या निवडणूक समीकरणाने सर्वाचेच लक्ष वेधून घेतले आहे.
श्रीनिवास पाटील यांच्यापासून ते राजीव जाधव यांच्यापर्यंत पिंपरी पालिकेतील बहुतांश आयुक्त राष्ट्रवादीचे विशेषत: पवारांच्या जवळचे होते. त्यापैकी बहुचर्चित ठरलेल्या दिलीप बंड यांच्या काळात राष्ट्रवादीला सर्वप्रथम स्पष्ट बहुमत मिळाले. त्याही पुढचे यश आशीष शर्मा यांच्या काळात राष्ट्रवादीला मिळाले. बंड व शर्मा यांनी आपापल्या पद्धतीने आयुक्त म्हणून काम केले असले, तरी त्याचा थेट राजकीय फायदा राष्ट्रवादीला झाला. राज्यभरात इतके घवघवीत यश राष्ट्रवादीला फक्त पिंपरी पालिकेतच मिळाले होते. त्यानंतर, प्रामाणिक व करडय़ा शिस्तीसाठी ओळखले जाणारे डॉ. श्रीकर परदेशी यांना अजितदादांनी पिंपरी पालिकेत आणले. मात्र, पूर्वीच्या आयुक्तांप्रमाणे त्यांची अजितदादांशी नाळ जुळली नाही. अनधिकृत बांधकामांवरून वेळोवेळी झालेल्या वादविवादांमुळे अजितदादांनी तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर दबाव आणून त्यांची बदली घडवून आणली, त्यांच्या जागी खास विश्वासातील राजीव जाधव यांची वर्णी लावली. जाधव यांना पिंपरी पालिकेत आणण्यामागे राष्ट्रवादीचे २०१७ च्या निवडणुकांचे गणित होते. त्यानुसार, त्यांची कार्यपध्दतीही होती. राष्ट्रवादीच्या तसेच पक्षातील नेत्यांच्या हिताचे अनेक निर्णय जाधव यांनी घेतले. जाधव यांनी मांडलेले शेवटचे अंदाजपत्रक राष्ट्रवादीचे ‘निवडणूक बजेट’ म्हणूनच पाहिले गेले. त्यामुळे जाधव आयुक्तपदी राहिल्यास ते राष्ट्रवादीला पोषक निर्णय घेतील, त्यांना झुकते माप देतील व त्याचा निवडणुकीत फटका बसेल, अशी भीती भाजप नेत्यांना होती. त्यामुळेच त्यांनी आयुक्तांच्या बदलीसाठी मुख्यमंत्र्यांकडे तगादा लावला. आगामी निवडणूक काळात उद्भवणारी परिस्थिती आपल्या दृष्टीने अडचणीची ठरेल, अशी जाणीव जाधव यांनाही झाली होती, त्याआधीच निघण्याची त्यांची मानसिकता झाली होती. अखेर, निवडणुकांचे वारे सुरू होण्यापूर्वीच मुख्यमंत्र्यांनी अजितदादांचे हस्तक मानले जाणारे आयुक्त हटवून तेथे स्वत:च्या मर्जीतील अधिकारी आणला आणि अजितदादांना शह दिल्याचे मानले जात आहे.