पूर्वीप्रमाणेच सर्वानाच विद्यावेतन देण्याची मागणी

पीएच.डी.च्या विद्यावेतन योजनेची पुनर्रचना करून गुणवत्तेवर आधारित पाठय़वृत्ती देण्याच्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या निर्णयाला विद्यार्थ्यांकडून विरोध दर्शवण्यात आला आहे. पाठय़वृत्तीच्या स्वरूपात विद्यावेतन सर्व विद्यार्थ्यांना दिले जाणार नसल्याने त्यात पक्षपात होण्याचा धोका असून, पूर्वीप्रमाणेच सर्वानाच विद्यावेतन देण्याची विद्यार्थ्यांची मागणी आहे.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात पीएच.डी. करणाऱ्या विद्यार्थ्यांना दर महिना आठ हजार, तर एम.फिल. करणाऱ्या विद्यार्थ्यांना ५ हजार रूपये विद्यावेतन देण्यात येते. या पूर्वी विद्यापीठ अनुदान आयोगाकडून या साठी निधी उपलब्ध करून दिला जात होता. मात्र यूजीसीने हा निधी देणे बंद केले आहे. त्यानंतर विद्यापीठाने स्वतच्या निधीतून विद्यावेतन सुरू ठेवले. मात्र, अलीकडेच विद्यापीठ प्रशासनाने हे विद्यावेतन थांबवले. त्यावरून काही महिन्यांपूर्वी आंदोलन झाल्यावर विद्यावेतन सुरू करण्यात आले. तर शैक्षणिक वर्ष २०१७—१८ मध्ये प्रवेश झालेल्या विद्यार्थ्यांचे विद्यावेतन अद्याप सुरू न झाल्याने या विद्यार्थ्यांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. मात्र, विद्यापीठाकडून  गुणवत्तेनुसार विद्यावेतनाऐवजी पाठय़वृत्ती देण्याची योजना आहे.

‘विद्यापीठाकडून केवळ नव्या विद्यार्थ्यांना विद्यावेतन दिले जात नाही. पाठय़वृत्तीच्या स्वरुपात विद्यावेतन देण्यास विरोध आहे. कारण गुणवत्तेआधारित पाठय़वृत्ती देण्याचे सांगितले जात असले, तरी गुणवत्ता कशी ठरवणार, त्याचे निकष काय, निवड कोण करणार असे बरेच प्रश्न निर्माण होतात. त्याशिवाय या प्रक्रियेत पक्षपात होण्याचा धोका असल्याने पाठय़वृत्ती न देता सर्वानाच जुन्या पद्धतीने विद्यावेतन द्यावे,’ असे विद्यार्थी सतीश गोरे म्हणाला.

शैक्षणिक वर्ष २०१७-१८ मध्ये पीएच.डी.साठी प्रवेश देताना विद्यापीठाने विद्यावेतन दिले जाणार नसल्याचे स्पष्ट केले नव्हते. तसेच विद्यावेतन मिळण्याबाबत केलेल्या पत्रव्यवहाराला विद्यापीठाने प्रतिसाद दिला नाही. कित्येक विद्यार्थ्यांसाठी विद्यावेतन हा शिक्षणासाठीचा आर्थिक दिलासा असतो. मात्र, विद्यापीठामुळे विद्यार्थ्यांना आर्थिक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. गुणवत्तेवर आधारित पाठय़वृत्ती देणे हा नंतरचा मुद्दा आहे. त्या बाबतही अनेक प्रश्न आहेत. त्यामुळे सर्वानाच पूर्वीप्रमाणे विद्यावेतन मिळाले पाहिजे, असे प्रवीण जाधव या विद्यार्थ्यांने सांगितले.