भाजपला सुगीचे दिवस आल्यानंतर अनेक हवशे, नवशे पक्षात आले, तेव्हापासून सुरू असलेला नव्या-जुन्यांचा वाद आणि नेत्यांच्या सुप्त संघर्षांच्या पाश्र्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी बैठक घेत त्यांचे मनोमीलन घडवून आणले. निवडणूकजाहीरनामा डोळय़ांसमोर ठेवून काम करण्याच्या सूचना देत मुख्यमंत्र्यांनी विकासाचा कानमंत्र स्वपक्षीयांना दिला, मात्र टक्केवारीच्या गणितात अडकून पडलेल्या भाजप नेत्यांना तो कितपत लागू पडेल, याविषयी साशंकता आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पिंपरी भाजप नेत्यांची मुंबईत बैठक झाली, तेव्हा मुख्यमंत्र्यांनी खडे बोल सुनावल्याचा फायदा म्हणजे, स्थानिक नेत्यांमध्ये आतापर्यंत ज्या काही कुरबुरी सुरू होत्या, त्या काही काळापुरत्या का होईना थांबल्या आहेत. काही महिन्यांपासून भाजपमधून बाहेरून येणारे लोंढे वाढले आहेत. त्यामुळे पक्षात नव्या-जुन्यांचा वाद रंगला आहे. हा वाद पूर्णपणे मिटवण्याची सूचना मुख्यमंत्र्यांनी स्थानिक नेत्यांना उद्देशून केली. कोणीही नवीन राहिला नाही, आता सर्व जुने झाले आहेत, अशी टिप्पणी त्यांनी केली. आमदार लक्ष्मण जगताप आणि महेश लांडगे यांचा पिंपरीत सत्ता आणण्यात सिंहाचा वाटा आहे, याचे स्मरण करून देतानाच एकत्रित निर्णय घेतले गेले पाहिजेत, अशी स्पष्ट सूचनाही त्यांनी केली.

बेकायदा बांधकामे, शास्तीकर इथपासून ते शहरातील महत्त्वपूर्ण विषयांची चर्चा या बैठकीत झाली. पालिका निवडणुकांच्या वेळी शहरातील विकासकामांसंदर्भात आपण जनतेला जो शब्द दिला, तो पाळला पाहिजे, त्यादृष्टीने कार्यवाही करा. कामाच्या दर्जात कोणत्याही प्रकारची तडजोड होता कामा नये, आधुनिक तंत्रांचा वापर केला पाहिजे, रस्त्यांवर सतत खोदाई होता कामा नये, शहरवासीयांना स्वच्छ, मुबलक व समान पाणीपुरवठा होण्यासाठी नियोजन असले पाहिजे, अशा विविध सूचना मुख्यमंत्र्यांनी केल्या. शहरातील ३० हजार गरजू महिलांना प्रशिक्षण दिल्याची बाब पदाधिकाऱ्यांनी निदर्शनास आणून दिल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी त्या गोष्टीचे आवर्जून कौतुक केले. भाजपच्या स्थानिक नेत्यांनी ‘बीव्हीजी’ कंपनीच्या (भारत विकास ग्रुप) कामाविषयी तक्रारीचा सूर काढला, मात्र मुख्यमंत्र्यांनी त्या कंपनीच्या कामाचे व दर्जाचे कौतुकच केले. शहरातील संरक्षण विभागाशी संबंधित प्रश्न बराच काळ प्रलंबित आहेत, त्यासंदर्भात संरक्षणमंत्र्यांसमवेत बैठक लावू आणि रेडझोनच्या प्रश्नांवर ठोस तोडगा काढू, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली. पालिकेच्या कामकाजात सुसूत्रता असावी म्हणून तीन महिन्यांनंतर आढावा बैठक घेतली जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

वास्तविक, अशा बैठकीची गरज होतीच, कारण शहर भाजपमध्ये अनागोंदी कारभार सुरू होता आणि कोणीच कोणाला जुमानत नव्हते. त्यामुळे पालिकेत नेमके काय चालले आहे, असा प्रश्न भाजपच्याच मंडळींना पडला होता. वर्षपूर्तीनंतरच्या प्रगतिपुस्तकावर ‘नापास’ असा लाल शेरा बसला असल्याने भाजपला कामगिरी सुधारावी लागणार आहे, त्याशिवाय कोणताही पर्याय राहिलेला नाही. ‘चोर’, ‘चोर’ म्हणून राष्ट्रवादीला बदनाम करणाऱ्या भाजपने दरोडेखोरीचा उद्योग सुरू केला, तो आता जनसामान्यांनाही कळू लागला आहे. नागरिकांना अपेक्षित असलेल्या सोयीसुविधांकडे दुर्लक्ष होत आहे. त्यासाठी प्राधान्यक्रम दिला पाहिजे. जाहीरनाम्यातील आश्वासनांची पूर्तता झाली पाहिजे, अन्यथा, आगामी काळात होणाऱ्या निवडणुकांमध्ये नापास होण्याबरोबरच नालायक ठरल्याचे खापरही डोक्यावर फुटण्याचा धोका आहे.