पिंपरी- चिंचवडमधील हिंदुस्तान अँटिबायोटिक्स लिमिटेड (एचए) या सरकारी कंपनीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्याने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. कंपनीने पगार थकवल्याने रामदास उकिर्डे यांनी आत्महत्या केल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे.

एचए कंपनीत सध्या ९५० कर्मचारी कार्यरत आहेत. या कंपनीत रामदास उकिर्डे हे काम लॅब टेक्निशियन म्हणून कामाला होते. बीएससीची पदवी घेतलेले रामदास उकिर्डे (वय ५१) हे पोटाच्या विकाराने देखील त्रस्त होते. यासाठी त्यांच्यावर चिंचवड येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. गेल्या काही वर्षापासून त्यांचा पगार होत नव्हता. त्यामुळे ते तणावाखाली होते. ते नेहमी पगाराविषयी कुटुंबीयांशी चर्चा करायचे. गेल्या दोन- तीन महिन्यापासून मी आत्महत्या करतो असे ते नेहमी कुटुंबातील सदस्यांना सांगायचे.

त्यांची पत्नी ब्युटी पार्लर चालवते, त्या शुक्रवारी दुपारी दुकानात जात असताना रामदास यांनी घराचा दरवाजा बाहेरून लावण्यास सांगितला होता. मी आत झोपतो असे त्यांनी पत्नीला सांगितले होते. काही वेळाने पत्नी दुकानातून घरी परतल्यानंतर रामदास यांनी राहत्या घरात साडीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. या घटनेचा तपास वाकड पोलीस करत आहेत.