मोठा गाजावाजा करत पिंपरी-चिंचवडचा ‘स्मार्ट सिटी’त सहभाग करून घेण्यात आला असला, तरी कामकाजातील विस्कळीतपणा कायम आहे. खर्चाची व्यवस्था लागलेली नाही की कुशल मनुष्यबळाची चिंता अजून मिटलेली नाही. मात्र, समाधानाची बाब म्हणजे किमानपक्षी ‘स्मार्ट सिटी’ कार्यालयाचा शोध तूर्त थांबला आहे. पिंपरी चौकातील क्रांतिज्योति सावित्रीबाई फुले स्मारक भवनात हे कार्यालय सुरू करण्याचे नियोजन करण्यात आले असून त्यासाठी तीन कोटी रुपये उपलब्ध करून दिले जाणार आहेत.
बऱ्याच नाटय़मय घडामोडीनंतर ‘स्मार्ट सिटी’साठी पिंपरी-चिंचवडची वर्णी लागली. मात्र, स्मार्ट सिटीसाठी अपेक्षित नियोजन तथा कार्यवाही अजूनही दिसून येत नाही. स्मार्ट सिटीसाठी पालिकेच्या खर्चानेच कामकाज सुरू आहे. अलीकडेच, २४ कोटी रुपये निधी शासनाकडून उपलब्ध झाला असून त्यातील तीन कोटी रुपये स्मार्ट सिटी कार्यालयासाठी असल्याचे सांगण्यात आले. स्मार्ट सिटीसाठी कार्यालय म्हणून शहरातील अनेक जागांची पाहणी करण्यात आली. सर्वप्रथम पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाच्या मुख्य कार्यालयीन इमारतीत हे कार्यालय करण्यात येणार होते. मात्र, प्रति महिना दोन लाख रुपये भाडे द्यावे लागणार होते म्हणून ही जागा नाकारण्यात आली. त्यानंतर, नेहरूनगर येथील अण्णासाहेब मगर स्टेडियमसमोरील जागा पाहण्यात आली. मात्र, त्याचाही विचार होऊ शकला नाही. त्यानंतर, मासूळकर कॉलनीतील पालिकेच्या इमारतीचा विचार करण्यात आला. दाट लोकवस्ती असल्याने तसेच स्थानिक नागरिकांनी विरोध केल्याने तो विचार पालिकेला सोडून द्यावा लागला. अखेर, पालिका मुख्यालयापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या फुले भवनाचा विचार पुढे आला. सर्व बाजूने पाहणी झाल्यानंतर स्मार्ट सिटीसाठी ही जागा योग्य असल्याचा अभिप्राय देण्यात आला. ही जागा स्मार्ट सिटीसाठी देण्यास विरोध होऊ शकतो, हे लक्षात घेऊन संबंधितांशी चर्चा करण्यात येत असल्याचे सांगण्यात आले.
‘स्मार्ट सिटी’साठी विशेष उद्देश वहन (स्पेशल पर्पज व्हेइकल – एसपीव्ही) कंपनीची यापूर्वीच स्थापना करण्यात आली आहे. त्यानंतर, कायदेशीर बाबींची पूर्तता करण्यात बराच वेळ गेला. ‘स्मार्ट सिटी’साठी अजूनही कुशल मनुष्यबल उपलब्ध झालेले नाही. प्रतिकूल परिस्थितीत स्मार्ट सिटीची वाटचाल सुरू आहे. सामान्य माणूस डोळ्यासमोर ठेवून नियोजन करण्याचा निर्णय संचालक मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. त्या दृष्टीने अपेक्षित कार्यवाही होताना दिसत नाही. या विषयातील प्रगती केवळ कागदावर असून प्रत्यक्षात काहीच नसल्याचे दिसून येते.