पुणे महापालिकेत सत्ता आल्यानंतर नाटककार राम गणेश गडकरी यांचा पुतळा बसवण्यात येईल, असे आश्वासन काही जण देत आहेत. त्यांनी पाच वर्षांपूर्वी लाल महालातून हटवलेला दादोजी कोंडदेव यांचा पुतळा बसवावा, अशी मागणी शिवसेनेचे जिल्हा संपर्क प्रमुख डॉ. अमोल कोल्हे यांनी केली आहे. तसेच दादोजींचा पुतळा हटवणारे काही जण सध्या भाजपसोबतच आहेत, असा आरोपही कोल्हे यांनी केला.

पुणे महापालिकेच्या निवडणुकीत नाटककार राम गणेश गडकरी यांचा पुतळा हटविल्याचे प्रकरण तापण्याची चिन्हे आहेत. या प्रकरणावरून शिवसेनेने भाजपवर निशाणा साधला आहे. गडकरी यांचा पुतळा हटविण्यात आला. ते चुकीचे आहे, असे शिवसेनेचे पुणे जिल्हा संपर्क प्रमुख अमोल कोल्हे यांनी म्हटले आहे. गडकरी यांच्या एका महानाट्यात छत्रपती संभाजी महाराजांची बदनामी झाल्याचा आरोप करून राम गणेश गडकरी यांचा पुतळा हटवण्यात आला होता. याबाबतही अमोल कोल्हे यांनी मत मांडले. गडकरी यांनी ते महानाट्य ५० ते ६० वर्षांपूर्वी लिहिले आहे, असे सांगून विचारांची लढाई विचारांनीच लढली पाहिजे, असे कोल्हे म्हणाले.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी पुण्यातील संभाजी उद्यानातील नाटककार राम गणेश गडकरी यांचा पुतळा संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी हटविला होता. या प्रकरणाचे पडसाद राज्यभरातील विविध भागांत उमटले होते. साहित्य क्षेत्रातूनही तीव्र प्रतिक्रिया नोंदवण्यात आल्या होत्या. कलाकार मंडळींनीही संभाजी ब्रिगेडच्या या कृत्याचा निषेध केला होता. त्यानंतर डोंबिवली येथे नुकत्याच पार पडलेल्या अखिल भारतीय साहित्य संमेलनात निषेधाचा ठराव एकमुखाने मंजूर करण्यात आला होता.