ज्येष्ठ गायिकेचा यथोचित सन्मान करण्याऐवजी गैरसमजात अडकून थेट पुरस्काराचा कार्यक्रमच पुढे पुढे ढकलण्याचा प्रकार पुणे महापालिकेने वर्षभर केल्यानंतर पुरस्कारच न स्वीकारण्याचा निर्णय ज्येष्ठ गायिका डॉ. प्रभा अत्रे यांना घ्यावा लागला आहे. त्याबरोबरच पुरस्काराबाबत महापालिकेकडून चुकीची आणि दिशाभूल करणारी माहिती दिली जात असल्याची वस्तुस्थितीही समोर आली आहे.
महापालिकेतर्फे दिल्या जाणाऱ्या ‘स्वरभास्कर’ पुरस्कारासाठी गेल्या वर्षी प्रभा अत्रे यांची निवड करण्यात आली होती. मात्र गेल्या वर्षभरात पुरस्कार प्रदान समारंभाचे आयोजन महापालिकेकडून करण्यात आले नाही. या पुरस्काराच्या आयोजनाबाबत अत्रे यांनी महापालिकेला काही अटी घातल्या होत्या, त्या अटी स्वीकारणे शक्य नसल्याचे महापौरांकडून सांगण्यात येत होते आणि पुरस्कार प्रदान कार्यक्रमाच्या आयोजनाबाबत असमर्थता व्यक्त केली होती. पुरस्कार प्रदान समारंभ नेमका कशात अडकला, याचा खुलासा आता अत्रे यांनीच केला असून त्यासंबंधीचे सविस्तर पत्र त्यांनी शुक्रवारी महापौरांना दिले. पुणे महापालिकेने दिलेला स्वरभास्कर पुरस्कार नाकारण्याचा निर्णय मी घेतला आहे. पुरस्काराबाबत महापालिकेकडून झालेला व्यवहार अपरिपक्व आणि बेजबाबदार होता, अशी व्यथा अत्रे यांनी या पत्रातून व्यक्त केली आहे.
पुरस्कार वितरण समारंभाच्या मुद्याला महापालिकेने सार्वजनिक स्वरूप दिल्यामुळे मला नाइलाजास्तव स्पष्टीकरण करावे लागत आहे. पुरस्कार वितरण समारंभाच्या अनुषंगाने महापालिकेने सोयीचा तेवढाच भाग सांगितला. वास्तविक पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम पुणे महानगरपालिका आणि मी अशा दोघांच्या दृष्टीने दर्जेदार व्हावा या हेतूने पुढाकार घेऊन मी काही सूचना केल्या होत्या. त्या अटी नव्हत्या आणि तसा माझा हट्टही नव्हता. केवळ सहकार्याची भावना होती. ही गोष्ट महापालिकेला मान्य नव्हती तर त्याच वेळी मला ते कळवायला हवे होते. स्वत:चा दोष टाळण्यासाठी महापालिकेने माझी आणि माझ्या फाउंडेशनची बदनामी केली आहे आणि मला दोष दिला आहे, असेही अत्रे यांनी या पत्रात नमूद केले आहे.

माझ्या गावी माझ्या माणसांकडून, पुण्याची नागरिक म्हणून माझे कौतुक, सन्मान करणे दूरच राहिले; पण पुरस्काराच्या निमित्ताने महापालिकेने माझी खूप मोठी बदनामी केली आहे. समारंभ कसा तरी उरकून टाकण्याची मानसिकता दिसली. जे घडले त्या पाश्र्वभूमीवर मी हा पुरस्कार नाकारत आहे.
डॉ. प्रभा अत्रे