सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने घेतलेल्या ऑनलाइन आणि ऑफलाइन (प्रत्यक्ष) परीक्षेच्या निकालातील त्रुटी समोर आल्या आहेत. परीक्षा देऊनही १८ हजार विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकेवर अनुपस्थित किंवा शून्य गुण असं नमूद करण्यात आलं होतं. त्यामुळे विद्यापीठाकडून आठ हजार विद्यार्थ्यांच्या निकालाची पुनर्तपासणी करण्यात येत असून दहा हजार ३३ विद्यार्थी परीक्षेला अनुपस्थित होते, अशी माहिती विद्यापीठाने दिली होती. दरम्यान, सर्व तक्रारींची चौकशी ३ डिसेंबरपर्यंत पूर्ण केली जाणार असून विद्यार्थ्यांना सुधारित गुणपत्रिका पाठवल्या जातील अशी माहिती सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठानं दिली आहे. इंडियन एक्स्प्रेसनं यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.

बुधवारी संध्याकाळी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठानं एक अधिसूचना जारी केली. ‘सर्व प्रकरणांची विश्लेषण करण्यात आलं आहे. विद्यार्थ्यांनी लॉग इन करण्यासाठी दोन ईमेल वापरणं, गोंधळ निर्माण करणं आणि परीक्षेच्या फॉर्ममध्ये न निवडलेल्या विषयांची परीक्षा घेणं यासारख्या सामान्य बाबी शोधल्या आहेत. जे विद्यार्थी फेरनिकालासाठी पात्र आहे त्यांचे सर्वांचे निकाल ३ डिसेंबरपर्यंत जाहीर केले जातील,’ असं अधिसूचनेत नमूद करण्यात आलं आहे.

“सर्वप्रथम पुन्हा परीक्षा घेण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. केवळ विद्यार्थ्यांनी तक्रारी केल्या याचा अर्थ प्रत्येक गुणपत्रिकेची पुन्हा पडताळणी केली जाईल असा नाही. जी खरी प्रकरणं आहे त्या विद्यार्थ्यांना नक्कीच न्याय दिला जाईल,” अशी माहिती सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. महेश काकडे यांनी दिली. “उदाहरण द्यायचं झाल्यास इंजिनिअरींगच्या २०० विद्यार्थ्यांनी फॉर्ममध्ये एका विषयाचं नाव दिलं होतं आणि परीक्षा दुसऱ्या विषयाची दिल्याचं समोर आलं आहे. काही विद्यार्थ्यांनी फॉर्म भरताना एक आयडी दिला होता. परंतु परीक्षा देताना वेगळ्या आयडीचा वापर केला. अशी ५३४ प्रकरणं आमच्या समोर आली आहेत. सर्व डेटा जुळवणं एक कठीण काम आहे, परंतु आम्ही ते करत आहोत. काही विद्यार्थ्यांनी फॉर्ममध्ये काही विषयांची निवड केली नाही परंतु आपल्या मर्जीनंच त्यांनी त्या परीक्षा दिल्याचंही आमच्या निदर्शनास आलं आहे. परंतु पात्र विद्यार्थ्यांना ३ डिसेंबरपर्यंत त्यांना नव्या गुणपत्रिका मिळतील,” असंही त्यांनी सांगितलं.