पुणे शहरात करोना रुग्णाच्या वाढत्या रुग्ण संख्येमुळे अनेक रुग्णांना रूग्णालय उपलब्ध होत नसल्याच्या अनेक तक्रारी समोर आल्या आहेत. आज पुण्यात पुन्हा अशी एक घटना समोर आली असून दिवसभर अनेक रूग्णालयात जाऊन देखील बेड उपलब्ध न झाल्याने, संतप्त झालेल्या रुग्णाच्या नातेवाइकांनी अखेर शहरातील अलका चौकात ठिय्या आंदोलन केल्यावर, महापालिकेकडून बेड उपलब्ध करण्यात आल्याचे समोर आले आहे. या तरुणास न्यूमोनिया झाला असून त्याची करोना चाचणी देखील घेण्यात आली आहे. या चाचणीचा अहवाल उद्या येणार आहे.

पुणे शहरात करोना विषाणूने  थैमान घातले असून दररोज रुग्ण संख्या वाढत आहे. आज अखेर करोनाबाधितांनी 40 हजारांचा  नकोसा रुग्णाचा टप्पा पार केला आहे. तर यामुळे अनेक रुग्णांना उपचारासाठी बेड मिळत नसल्याचे समोर येत आहे.

आज धायरी येथील 33 वर्षाचा तरुणास शहरातील कोणत्याही रूग्णालयात बेड मिळाला नाही. या पार्श्वभूमीवर अलका चौकात रुग्णवाहिका उभी करून, नातेवाइकांनी भर चौकात ठिय्या आंदोलन करण्यास सुरुवात केली. या घटनेचा व्हिडिओ काही क्षणात शहरातील सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला. यावर तीव्र प्रतिक्रिया येऊ लागल्या. तेथील पोलिसांनी नातेवाईकांची समजूत काढली. चौकातील घडलेला सर्व प्रकार महापालिकेच्या आरोग्य विभागास कळविण्यात आला. त्यावर तात्काळ महापालिकेच्या दळवी रूग्णालयात बेड उपलब्ध करून देत असल्याचे सांगण्यात आले. त्यावर नातेवाइकांनी आंदोलन मागे घेत, त्या तरुणास रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

या घटनेबाबत आरोग्य प्रमुख रामचंद्र हंकारे यांना विचारले असता ते म्हणाले की, 33 वर्षाच्या तरुणाला शहरातील अनेक भागात फिरून देखील बेड उपलब्ध होत नसल्याने, संतप्त झालेल्या नातेवाईकांनी अलका चौकात आंदोलन केले. या घटनेची माहिती मिळताच, तात्काळ महापालिकेच्या दळवी रूग्णालयात बेड उपलब्ध करून देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले