पुणे शहरातील नालेसफाईच्या कामाचा आढावा बैठकीत महापौर मुक्ता टिळक यांनी पालिका प्रशासनाच्या कामावर नाराजी व्यक्त केली. पालिका प्रशासनाच्यावतीने नालेसफाईचे काम योग्य न झाल्याने नागरिकांच्या घरामध्ये पाणी जाण्याच्या घटना घडल्या होत्या. या प्रकारानंतर नालेसफाईच्या कामासंदर्भातील अहवाल शुक्रवारी प्रशासनाने महापौरांकडे सुपूर्द केला. मात्र मुक्ता टिळक यांनी आधिकाऱ्यांचा हा अहवाल फेटाळून लावला. आज पार पडलेल्या प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बैठकीत शहरातील सद्य स्थितीला जबाबदार असलेल्या अधिकाऱ्यांवर काय कारवाई करणार याचा अहवाल तातडीने सादर करण्याच्या सूचना महापौरांनी प्रशासनाला दिल्या आहेत.

पहिल्याच पावसात पुणे शहरातील बहुतांश भागात घरामध्ये पाणी जाण्याच्या घटना घडल्या. यामुळे पावसाळा सुरु होण्यापूर्वी प्रशासनाकडून करण्यात आलेल्या कामाबाबत प्रश्न निर्माण झाले. त्यानंतर अधिकारी वर्गाकडून नाल्यांची पाहणी करण्यात आली. तेव्हा कचऱ्यामुळे पाणी साचल्याचे सांगण्यात आले. शहरातील पावसाळ्याच्या सुरुवातीलाच शहरातील नाले तुंबल्यामुळे खरच नालेसफाई झाली का ? असा प्रश्न उपस्थित करण्यात आला असून या कामामध्ये कोट्यावधी रुपयांचा घोटाळा झाला असण्याची शक्यता विरोधकांकडून वर्तवली जात आहे. या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी शहरातील नाले सफाईच्या कामाची पाहणी करण्यासाठी १५ अधिकाऱ्यांची नेमणूक केली होती. तसेच या कामांचा अहवाल सादर करण्याच्या सूचना प्रशासनास दिल्या होत्या. त्यानुसार अतिरिक्त आयुक्त प्रेरणा देशभ्रातार यांनी नाले सफाईच्या कामाचा अहवाल महापौरांकडे सादर केला. या अहवालात नालेसफाईची कामे योग्य पध्दतीने झाली असल्याचे स्पष्टीकरण देण्यात आले.

मात्र,  योग्य कामे झाली असतील तर शहरात ही स्थिती आलीच कशी याचे कोणतेही उत्तर प्रशासनाने दिलेले नाही. तसेच या बैठकीत महापौरांनी विचारलेल्या अनेक प्रश्नांवर अतिरिक्त आयुक्तांनी मौन बाळगल्याचे दिसले. त्यामुळे मुक्ता टिळक यांच्यासह सभागृह नेते श्रीनाथ भिमाले आणि स्थायी समिती अध्यक्ष मुरलीधर मोहोळ यांनी प्रशासनाच्या कामावर नाराजी व्यक्त करत त्यांनी सादर केलेला अहवाल फेटाळून लावला.आता प्रशासनाच्या नियोजन शून्य कारभारामुळे पुणेकर नागरिकांना पहिल्याच पावसात नाहक त्रासाला सामोरे जावे लागल्याने पालिका प्रशासन अधिकाऱ्यांवर कारवाई अहवालाच्या मागणीवर काय स्पष्टीकरण देणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.