पुणे शहरात दरवर्षी गणेशोत्सव मोठ्या उत्साहाच्या वातावरणात साजरा करण्यात येतो. लाडक्या गणरायाला निरोप देण्यासाठी व विसर्जन मिरवणुकीमधील भव्यदिव्य देखावे पाहण्यासाठी येथील अलका टॉकीज चौकात नागरिक मोठ्या संख्येने येत असतात. या मिरवणुकीत साकारण्यात आलेल्या देखाव्यांची उंची देखील जास्त असते. मात्र पुढील वर्षी मेट्रोचा पुलामळे या पारंपारिक गणेश मंडळांच्या देखाव्यांच्या उंचीवर मर्यादा येण्याची शक्यता आहे. याबाबत अधिक माहिती घेण्यासाठी महामेट्रोच्या अधिकाऱ्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होऊ शकला नाही.

पुणे शहरात दरवर्षी गणरायाची विसर्जन मिरवणुक पाहण्यासाठी हजारो नागरिक लक्ष्मी, कुमठेकर आणि टिळक या रस्त्यावर गर्दी करतात. या मिरवणुकीमधील मानाच्या पाच आणि श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती, अखिल मंडई गणपती मंडळाच्या देखाव्यांकडे सर्वांचे विशेष लक्ष असते. यातील मानाचा तिसरा गुरुजी तालीम व मानाचा चौथा तुळशीबाग गणपती, श्रीमंत दगडूशेठ गणपती, अखिल मंडई गणपती मंडळाचे खास देखावे असतात. या मंडळाच्या देखाव्यांची साधारण उंची २६ ते २८ फुटांच्या आसपास असते. तर पुढील वर्षी अलका चौकातून संभाजी पुलावरून खंडोजी बाबा चौकापासून मेट्रोचा पूल जाणार असून, या पुलाची उंची खंडोजी बाबा चौकातील पुलाच्या रस्त्यापासून साधारण साडेपाच मीटर असणार आहे. यामुळे साधारण १८ ते २० फूट एवढी उंची पुलावर राहणार आहे. हे लक्षात घेता सध्यस्थितीस अनेक मंडळाच्या देखाव्यांची उंची २५ फुटांच्या पुढे असल्याने आता पुढील वर्षी या मंडळांना देखाव्यांची उंची कमी करावी लागणार हे निश्चित आहे.

‌ याबाबत विवेक खटावकर यांच्याशी संवाद साधला असता ते म्हणाले की, आमच्या तुळशीबाग गणपतीची विसर्जन मिरवणुकी दरम्यान रस्त्यापासून ट्रॉलीची उंची चार फूट आणि ट्रॉलीमध्ये चौथरा दोन फुटाचा करण्यात येतो. तसेच मूर्तीची उंची १५ फूट असल्याने देखाव्याचे उंची २१ फूट होते. त्यामुळे पुढीलवर्षी मेट्रोच्या पुलामुळे देखावा पुलावरून घेऊन जाताना अडचण निर्माण होणार आहे. त्यावर आम्ही मंडळातील कार्यकर्त्यांशी चर्चा केली असून हायड्रॉलिक पद्धतीने देखाव्याची उंची पुलावर कमी करता येईल का याबाबत विचार सुरू आहे. सध्या यासाठी वर्षभराचा कालावधी असल्याने आम्ही निश्चित काहीना काही मार्ग काढू असे त्यांनी सांगितले.