रेल्वे प्रवाशांचा संताप आणि हाल; रिक्षा चालकांकडून लूट

लोणावळ्याकडून दुपारी पुण्याकडे येणारी लोकल मागील दोन दिवसांपासून कोणतीही पूर्वसूचना न देता चिंचवड स्थानकापर्यंतच सोडली जात असल्याने प्रवाशांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे चिंचवड ते पुणे स्थानकादरम्यानचा प्रवास करताना प्रवाशांना हाल सहन करावे लागले. तीव्र उन्हामुळे स्थानकापासून रिक्षाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची काही रिक्षा चालकांकडून अवाच्या सवा भाडे उकळून अक्षरश: लूट करण्यात आली.

पुणे-लोणावळा दरम्यान पुणे रेल्वेची एकमेव उपनगरीय रेल्वे वाहतूक सेवा आहे. नोकरदार, विद्यार्थी आणि व्यापारी आदींकडून या सेवेचा प्रामुख्याने लाभ घेतला जातो. पुणे ते लाणावळा-तळेगाव आदी मार्गावर लोकलच्या दिवसभरात ४४ फेऱ्या होतात. दुपारी लोणावळ्यावरून सुटणारी एक लोकल दुपारी साडेबाराच्या सुमारास चिंचवड स्थानकावर येते. त्यानंतर सुमारे अर्ध्या तासाच्या प्रवासानंतर ती पुणे स्थानकावर पोहोचते. बुधवारी ही लोकल चिंचवड स्थानकावर आल्यानंतर बराच वेळ होऊनही गाडी पुढे जात नसल्याने प्रवासी खाली उतरले. स्टेशन मास्तरांना घेराव घालून विचारणा केल्यानंतर त्यांच्याकडून वीजवाहिन्यांच्या दुरुस्तीच्या कामाची माहिती देण्यात आली. लोणावळ्यातून गाडी सुटताना किंवा लोणावळा ते चिंचवड स्थानकादरम्यानच्या स्थानकांवर याबाबत प्रवाशांना कोणतीही माहिती देण्यात आली नव्हती. रेल्वेकडून अचानकपणे गाडी पुढे न सोडण्याचा निर्णय घेतल्याने त्याबाबत तीव्र संताप व्यक्त करण्यात आला.

गुरुवारी दुसऱ्या दिवशीही तसाच प्रकार झाला. चिंचवड स्थानकात लोकल आल्यानंतर ती पुढे जाणार नसल्याचे सांगण्यात आले. चिंचवड ते पुणे स्थानकादरम्यान पिंपरी, कासारवाडी, दापोडी, खडकी आणि शिवाजीनगर ही महत्त्वाची स्थानके येतात. लोणावळ्यातून येणाऱ्या लोकलमधील सत्तर टक्क्य़ांहून अधिक प्रवासी याच स्थानकावर उतरणारे असतात. दोन दिवसांपासून लोकल चिंचवडपर्यंत धावत असल्याने या प्रवाशांचे हाल झाले. तीव्र उन्हाळा असल्याने स्थानकापासूनच इच्छित स्थळी जाण्यासाठी अनेक प्रवाशांनी रिक्षाचा पर्याय स्वीकारला. मात्र, प्रवाशांची हतबलता लक्षात घेऊन काही रिक्षा चालकांनी लूटमार केली. अगदी चार ते पाच किलोमीटरच्या अंतरासाठी दीडशे-दोनशे रुपयांची मागणी करण्यात येत होती. गरज असल्याने अनेक प्रवाशांनी ही लूट सहन केली.

कोणतीही पूर्वसूचना न देता दोन दिवसांपासून दुपारची लोकल चिंचवड स्थानकापर्यंतच धावते आहे. त्यामुळे प्रवाशांकडून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. उन्हाच्या तीव्र झळांमध्ये चिंचवड ते पुणे स्थानाकादरम्यानचा पुढचा प्रवास करण्यासाठी अनेकांचे हाल होत आहेत. पुणे रेल्वेकडून लोकलच्या प्रवाशांना सातत्याने वाऱ्यावर सोडले जात असल्याचे वास्तव आहे.   विजया ढोरे, प्रवासी

पहिल्या दिवशी लोहमार्गाच्या वीजवाहिन्यांच्या दुरुस्तीबाबत (ओव्हरहेड) तातडीचे काम करावे लागल्याने लोकल चिंचवड स्थानकावर थांबविण्यात आली होती. दुसऱ्या दिवशीही हेच काम करण्याचे नियोजन असल्याने याबाबत स्थानकांवर प्रवाशांना माहिती देण्याची व्यवस्था करण्यात आली होती. शुक्रवारपासून ही गाडी नियमितपणे धावणार आहे.    मनोज झंवर, पुणे रेल्वे जनसंपर्क अधिकारी