पैसे घेऊन अतिमहत्त्वाच्या व्यक्तीच्या कोटय़ातून वेटिंगवरील आरक्षित तिकीट निश्चित करून देण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्यासह नऊ खासदारांच्या बनावट लेटरहेडचा वापर केल्याचे सीबीआयच्या तपासात समोर आले आहे. या प्रकरणी सीबीआयने आणखी एकाला अटक केली आहे.
खासदार आणि आमदार यांना असलेल्या कोटय़ातून रेल्वेचे तिकीट आरक्षण करण्यासाठी तिकिटापेक्षा जास्त दोन हजार रुपये घेऊन काम करणारा मध्यस्थ दिनेश कुमार (रा. समलीपूर, बिहार) याला सीबीआयने २४ जून रोजी अटक केली होती. त्याला न्यायालयाने एक जून पर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती. त्याच्याकडे तपास केला असता त्याने नऊ खासदारांच्या बनावट लेटर हेडचा वापर केल्याचे निष्पप्न झाले आहे. या प्रकरणात चिंचवड येथील साई टुर्स अॅण्ड ट्रॅव्हल्स कंपनीचा मालक सचिन अण्णासाहेब नाईकवडे (वय ३५) याला अटक केली आहे. त्याला न्यायालयाने सात दिवस पोलीस कोठडी सुनावली. तर, दिनेश कुमारच्या पोलीस कोठडीत सात दिवसांची वाढ करण्यात आली आहे.
सीबीआयचे वकील आयुब पठाण आणि विवेक सक्सेना यांनी दिलेल्या माहितीनुसार, दिनेश कुमार हा देशभरात कोणत्याही रेल्वे स्थानकावरून सुटणाऱ्या एक्सप्रेस रेल्वेचे तिकीट एजंटना आरक्षित करून देत होता. रेल्वेचे तिकीट आरक्षित करण्यासाठी प्रत्येकी दोन हजार रुपये बँकेच्या खात्यावर स्वीकारत होता. हे तिकीट आरक्षित करण्यासाठी खासदारांच्या लेटरहेड आणि राजमुद्रेचा गैरवापर करीत होता. प्रवास करणारी व्यक्ती ही खासदाराची नातेवाईक असून त्या व्यक्तीने व्हीआयपी कोटय़ातून तिकीट आरक्षित करावे, अशी लेटरहेड दिल्लीतील रेलभवनच्या बॉक्समध्ये टाकत होता. एक्सप्रेसच्या प्रवाशांची यादी लागण्यापूर्वी काही काळ लेटरहेड टाकल्याने ती तपासणी न करता तातडीने रेलभवनवरून रेल्वे स्थानकावर फॅक्स केले जात आणि त्या व्यक्तीचे आरक्षणाचे वेटिंगवर असलेले तिकीट निश्चित होत असल्याचे समोर आले आहे.