कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भ या चारही विभागांत तुरळक ठिकाणी पुढील तीन दिवस पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. काही ठिकाणी वादळी वाऱ्यांसह आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस होण्याचा इशाराही देण्यात आला आहे.

गेल्या २४ तासांत सलग दुसऱ्या दिवशी सातारा, पुणे जिल्ह््यांत पावसाने हजेरी लावली, तर औरंगाबाद, नगर जिल्ह््यांत दुपारनंतर ढगाळ वातावरण होऊन एखादी पावसाची सर कोसळली. दुपारी कडक ऊन, सायंकाळी मेघगर्जना, जोरदार वारा आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस असे वातावरण सध्या पुण्यासह विविध जिल्ह््यांत झालेले आहे.

गारांसह हजेरी…

महाराष्ट्रात रविवारपासून (२५ एप्रिलपासून) पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली होती. त्यानुसार सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह््यांमध्ये गारपिटीसह वादळी पावसाने हजेरी लावली.

पुण्यात दुपारनंतर हलक्या पावसाने हजेरी लावली. कोल्हापूर शहरात सोमवारी रात्री मुसळधार पाऊस आला. काही ठिकाणी वृक्ष उन्मळून पडले. अनेक झाडांच्या फांद्या तुटल्या. वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे अंधाराचे साम्राज्य पसरले. तासभर कोसळणाऱ्या पावसामुळे अवघे शहर जलमय झाले होते.

हवाभान…  मराठवाड्यापासून दक्षिण तमिळनाडूच्या किनारपट्टीपर्यंत सध्या कमी दाबाचा पट्टा अद्यापही कायम आहे. हा पट्टा उत्तरअंतर्गत कर्नाटक, तेलंगणा आणि रायलसीमा या मार्गाने गेला आहे. परिणामी तेलंगणसह आंध्र प्रदेश किनारपट्टी, कर्नाटक, के रळ, तमिळनाडू या राज्यांत पावसाळी वातावरण निर्माण झाले आहे.

इशारा…  कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह््यांत २८, २९ आणि ३० एप्रिल, तर रायगड जिल्ह््यात २९ व ३० एप्रिल रोजी वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे. पुणे, नगर, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर जिल्ह््यांत तुरळक ठिकाणी २८, २९ आणि ३० एप्रिल या दोन दिवसांत वादळी वारे व मेघगर्जनेसह हलक्या पावसाची शक्यता आहे. परभणी, बीड, लातूर, नांदेड, हिंगोली, उस्मानाबाद जिल्ह््यात तसेच विदर्भात चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ जिल्ह््यांत तुरळक ठिकाणी २८, २९ आणि ३० एप्रिल या दोन्ही दिवशी जोरदार वारे, विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे.