‘एफटीआयआय’च्या नियामक मंडळाच्या अध्यक्षपदी गजेंद्र चौहान यांची नियुक्ती आणि त्याविरोधात विद्यार्थ्यांनी सुरू केलेले आंदोलन या दोन्ही गोष्टींना काहीच अर्थ नाही. या पेक्षा ‘एफटीआयआय’ संस्थेला जपणे अधिक महत्त्वाचे वाटते, असे मत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यक्त केले. पुण्यातील ‘अक्षरधारा’च्या दालनाला राज ठाकरे यांनी गुरूवारी भेट दिली. त्यावेळी राज यांनी ‘एफटीआयआय’बाबतची आपली भूमिका मोकळेपणाने मांडली.
अनेक गजेंद्र येतील आणि जातील. मात्र, संस्थेचे काय? तेथील कारभार योग्यरितीने चालतो की नाही हे पाहणे जास्त महत्त्वाचे आहे. त्याकडे सरकारने लक्ष द्यायला हवे. अनेक दिग्गज कलावंतांना घडवणारी ही संस्था जपण्याशी आवश्यकता आहे, असे राज यावेळी म्हणाले. तसेच चित्रपट निर्मितीत जगभरात आता उंची गाठली जात आहे. काळानुसार संस्थेत तांत्रिक बदल देखील व्हायला हवेत. आधुनिक तंत्रज्ञान या संस्थेतील विद्यार्थ्यांना मिळत आहे का? हा प्रश्न मला अधिक महत्त्वाचा वाटतो, असेही राज पुढे म्हणाले. ‘एफटीआयआय’ वादाला राजकीय रंग देणे चुकीचे असून सर्वांनी एकत्र येऊन या वादावर तोडगा काढायला हवा, असे राज म्हणाले.