गारवा कमी होण्याचा, तसेच वाढण्याचा पुणे वेधशाळेचा अंदाज

पुणे : पुणे शहर आणि परिसरातील तापमानामध्ये सध्या झपाटय़ाने बदल होत आहेत. निरभ्र आकाशाच्या स्थितीमुळे सध्या रात्रीचे किमान तापमान कमी होऊन गारवा वाढला आहे. मात्र, दोन दिवसांनंतर अंशत: ढगाळ स्थिती निर्माण होणार असल्याने गारवा काही प्रमाणात कमी होणार आहे. त्यानंतर डिसेंबरच्या सुरुवातीला पुन्हा थंडी वाढत जाणार असल्याचा अंदाज पुणे वेधशाळेकडून व्यक्त करण्यात येत आहे.

पाऊस लांबल्यामुळे यंदा थंडीला विलंब झाला आहे. हिमालयात हिमवृष्टी होत आहे. उत्तर भारतात काही ठिकाणी पाऊसही पडत आहे. परिणामी त्या भागातून राज्याच्या दिशेने थंड वारे येत असल्याने किमान तापमानात घट होऊन गारव्यात वाढ होत आहे. पुणे शहर आणि परिसरातही किमान तापमानात घट होत असल्याने संध्याकाळी आणि रात्री गारवा जाणवतो आहे. मात्र, स्थानिक वातावरणाचा परिणाम म्हणून चार ते पाच दिवसांच्या टप्प्याने तापमानात मोठय़ा प्रमाणावर चढ-उतार होत असल्याचे दिसून येत आहे. सोमवारी शहरातील किमान तापमान प्रथमच १५ अंशांच्या खाली गेले. त्यामुळे गारव्यात वाढ झाली आहे. कमाल तापमानाचा पाराही ३० अंश सेल्सिअसच्या खाली गेल्याने उन्हाचा चटका कमी झाला आहे. मात्र, त्यात आठवडाभर चढ-उतार होत राहणार असल्याचा अंदाज आहे. पुणे वेधशाळेने दिलेल्या अंदाजानुसार २६ आणि २७ नोव्हेंबरला शहरात आकाश मुख्यत: निरभ्र राहणार आहे. आकाशाच्या याच स्थितीमुळे तीन ते चार दिवसांमध्ये शहरातील किमान तापमान १७ अंशांवरून १५ अंशांच्या खाली आले. दोन दिवसांत तापमानात फारसा बदल होणार नाही. परंतु, २८ नोव्हेंबरनंतर आकाशाची स्थिती अंशत: ढगाळ होणार आहे. त्यामुळे किमान तापमान १७ ते १८ अंशांपर्यंत जाऊन गारवा काहिसा कमी होण्याची शक्यता आहे.

पुणे १४.६ अंश सेल्सिअसवर!

पुणे शहराचे मध्यवर्ती किमान तापमान सोमवारी १४.६ अंश नोंदविले गेले. यंदाच्या हंगामातील हे सर्वात कमी तापमान आहे. मात्र, अद्यापही किमान तापमान सरासरीपेक्षा १.२ अंशांनी अधिक आहे. मध्यवर्ती किमान तापमानापेक्षा पाषाण आणि लोहगावचे तापमान मात्र अधिक आहे. सोमवारी लोहगाव येथे १६.४ अंश, तर पाषाण येथे १५.१ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली.