पिंपरीतील डेअरी फार्म येथे भरधाव स्विफ्ट मोटारीने धडक दिल्याने रविवारी सकाळी एका लहान मुलाचा जागीच मृत्यू झाला. नागरिकांनी सातत्याने संपर्क साधूनही पोलीस घटनास्थळी वेळेवर न आल्याने संतापलेल्या नागरिकांनी रस्त्यावर मोठे दगड टाकून रस्ता बंद केला. त्यानंतर, जाळपोळ व तुफान दगडफेक झाली, त्यातून पोलीस व त्यांच्या गाडय़ाही सुटल्या नाहीत.
अमन रघुनाथ यादव (वय-१०, रा. डेअरी फार्म, पिंपरी) असे मयत विद्यार्थ्यांचे नाव आहे. पिंपरीतील इंदिरा गांधी विद्यालयात तो पाचवीत शिकत होता. तो सकाळी सायकलवरून फेरी मारत होता. पिंपरीगावाकडून महामार्गाच्या दिशेने जाणाऱ्या पांढऱ्या रंगाच्या स्विफ्ट मोटारीने त्याला जोरदार धडक दिली, त्यात तो गंभीर जखमी झाला. अपघातानंतर चालक पळून गेला. घटनेची माहिती मिळाल्यानंतर अमनचे नातेवाईक व आजूबाजूचे नागरिक घटनास्थळी आले. नियंत्रण कक्षाला तसेच पिंंपरी पोलिसांना त्यांनी कळवले. मात्र, दोन तासानंतरही पोलीस पोहोचले नाहीत. नातेवाईक व आजूबाजूचे नागरिक संतप्त झाले. त्यांनी मोठे दगड आडवे लावून डेअरी फार्म येथील दोन्हीकडील वाहतूक बंद केली. त्यानंतर, जाळपोळ व दगडफेक सुरू झाली. तणावाचे वातावरण निर्माण झाले. पोलिसांची कुमक घटनास्थळी दाखल झाली. पोलीस उशिराने आल्याने संतापलेल्या नागरिकांनी पोलिसांवर तसेच त्यांच्या वाहनांवरही दगडफेक केल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर काही ज्येष्ठ नागरिक व सेना पोलिसांनी मध्यस्थी केल्याने तणाव निवळला.