पारा ८.२ अंशांवर, दोन दिवस कडाका कायम राहणार

पुणे : पुणे शहर आणि परिसरात शुक्रवारी यंदाच्या हंगामातील नीचांकी ८.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. कडाक्याच्या थंडीमुळे संपूर्ण शहर गारठून गेले. त्यामुळे उबदार कपडे घातल्याशिवाय संध्याकाळनंतर बाहेर पडणे कठीण झाले होते. पुणे वेधशाळेने दिलेल्या अंदाजानुसार पुढील दोन दिवस शहर आणि परिसरात थंडीचा कडाका कायम राहणार आहे.

आठवडय़ापूर्वी शहरात ढगाळ स्थिती निर्माण झाल्यामुळे किमान तापमानात वाढ होऊन थंडी काहीशी गायब झाली होती. तीन ते चार दिवसांपासून शहरातील वातावरण कोरडे झाले. आकाशाची स्थितीही निरभ्र झाली. त्यामुळे थंडीसाठी पोषक वातावारण निर्माण होऊ शकले. तीन दिवसांपासून किमान तापमानात घट सुरू झाली होती. बुधवारपासून शहरात थंडीचा कडाका वाढला. गुरुवारी त्यात आणखी भर पडली. शुक्रवारी पहाटेच्या सुमारास हुडहुडी भरविणारी थंडी शहराने अनुभवली. बोचऱ्या वाऱ्यांमुळे थंडीची तीव्रता आणखी वाढली. शुक्रवारी सकाळी काही भागात दाट धुकेही पडले होते.

दिवसाच्या कमाल तापमानातही घट झाली असल्याने दुपारीही थंड वारे जाणवत आहेत. संध्याकाळनंतर बोचऱ्या वाऱ्यांची तीव्रता वाढते आहे. शुक्रवारी सकाळी दहानंतरही गारवा कमी झाला    नव्हता. रात्री आणि सकाळी विविध ठिकाणी शेकोटय़ा पेटविल्याचे चित्र दिसत होते. घरातून बाहेर पडणारा प्रत्येक जण स्वेटर, कानटोपी, मफलर घालून किंवा शाल पांघरलेल्या स्थितीत दिसून येत होता. दोन दिवसांपासून थंडीची अनुभूती मिळत असल्याने प्रत्येकाच्या चर्चेतही थंडीचा विषय ऐकू येत होता. वेधशाळेच्या अंदाजानुसार आणखी दोन दिवस शहरात निरभ्र आकाशाची स्थिती राहणार आहे. त्यामुळे थंडीचा कडाका कायम राहण्याची शक्यता आहे. त्यानंतर २३ जानेवारीपर्यंत आकाश अंशत: ढगाळ राहील. त्यामुळे तापमानात काही प्रमाणात वाढ होईल. या काळात शहरात काही भागात दाट धुके पडण्याची शक्यता आहे.

पुणे शहर आणि परिसरात यंदा किमान तापमानाचा पारा १० अंशांखाली जाऊ शकला नव्हता. डिसेंबरच्या शेवटच्या आठवडय़ात सर्वाधिक थंडी असते. गेल्या दहा वर्षांमध्ये प्रत्येक हंगामात डिसेंबर महिन्यामध्ये शहरातील किमान तापमानाचा पारा १० अंशांखाली गेला होता. यंदा प्रथमच डिसेंबर महिना कडाक्याच्या थंडीविना गेला. मात्र, त्याची कसर जानेवारी महिन्याने भरून काढली असल्याचे चित्र यंदा पाहायला मिळाले. शुक्रवारी ८.२ अंश किमान तापमानाची नोंद होत यंदाच्या हंगामात प्रथमच किमान तापमानाचा पारा १० अंशांखाली गेला.