News Flash

मनसेतील बंडाचे अनेकांना ‘चटके’

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची शहर कार्यकारिणी घोषित झाल्यानंतर गेला पंधरवडाभर पक्षात जे काही रण माजले आहे आणि जे प्रकार सुरू आहेत ते पाहून मनसेबरोबरच इतर पक्षातील

| December 3, 2013 03:00 am

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची शहर कार्यकारिणी घोषित झाल्यानंतर गेला पंधरवडाभर पक्षात जे काही रण माजले आहे आणि जे प्रकार सुरू आहेत ते पाहून मनसेबरोबरच इतर पक्षातील कार्यकर्ते आणि पदाधिकारीही थक्क झाले आहेत. पक्षातील बंडाचे ‘चटके’ आतापर्यंत अनेकांना बसले असून ही धग शांत होण्याची चिन्ह अजूनतरी नाहीत.
मनसेची तीनशेहून अधिक पदाधिकाऱ्यांची कार्यकारिणी १६ नोव्हेंबर रोजी घोषित करण्यात आली. कार्यकारिणी घोषित करताना विद्यमान पदाधिकाऱ्यांमध्ये बदल करण्यात आले नाहीत. मात्र, ज्यांना पदाधिकारी करण्यात आले आहे, त्यातील अनेकांबद्दल नाराजी असून पक्षासाठी काम करूनही कार्यकारिणीत स्थान न मिळाल्यामुळे अनेकांनी बंडाचा झेंडा हाती घेतला आहे. कार्यकारिणी घोषित झाली की सर्वच पक्षांमध्ये काही जण विरोधी सूर लावतात. मात्र, पक्षातील वरिष्ठ मंडळी अशांचा राग शांत करण्यात पुढे यशस्वी देखील होतात.
मनसेतील प्रकार मात्र उलटा आहे. कार्यकारिणी जाहीर झाल्यानंतर लगेचच पक्ष कार्यालयासमोर जोरदार निदर्शने आणि पदाधिकाऱ्यांना शिवीगाळ, धक्काबुक्की असे प्रकार झाले होते. नाराजांना शांत करण्याचे प्रयत्नही नंतर आठवडाभर सुरू होते. मात्र, नाराज कार्यकर्ते शांत न होता उलट अधिकच आक्रमक झाल्याचे चित्र आहे. बंडाचे ‘चटके’ही अनेकांना बसत आहेत. त्यामुळेच पहिल्या दिवशी जे प्रकार झाले, त्यापेक्षा वरचढ प्रकार आता सुरू झाले आहेत. प्रत्यक्षदर्शीनी दिलेल्या माहितीनुसार पक्षकार्यालयात रविवारी (१ डिसेंबर) झालेले सर्व प्रकारही त्याच गटात मोडणारे होते. पक्षकार्यालयात झालेले वादंग तसेच शिवीगाळ, आरोप-प्रत्यारोप, गटागटांमध्ये झालेले शक्तिप्रदर्शन एवढे भीतीदायक होते, की त्या वादात त्याहूनही अधिक वाईट घटना घडू शकली असती, अशी कार्यालयातील परिस्थिती होती.
शहराध्यक्ष पदावर बाळा शेडगे आणि प्रकाश ढोरे अशा दोघांची नियुक्ती करण्यात आली तेव्हापासूनच पक्षात सारे काही अलबेल नाही, हा संदेश मिळाला होता. नवी कार्यकारिणी जाहीर करतानाही शहराध्यक्ष पदाप्रमाणेच विद्यार्थी सेनेच्या अध्यक्षपदी आशिष साबळे आणि सुधीर धावडे यांची नियुक्ती करण्यात आली असून हा निर्णयही पुरेसा बोलका आहे. नाराज कार्यकर्त्यांनी देखील अन्य पदाधिकाऱ्यांबरोबर चर्चा करताना सातत्याने राज ठाकरे यांची भेट घडवून द्या, अशी मागणी सतत केली असून तूर्त तरी अन्य पदाधिकाऱ्यांमार्फतच पुण्याच्या वादावर तोडगा काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
काय चाललयं मनसेत…

  • – घोषित कार्यकारिणीत तीनशे जण
  • – त्यानंतर शेकडो जण नाराज
  • – नाराजांकडून कार्यालयात तोडफोड
  • – अद्यापही तोडगा काढण्यात यश नाही

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 3, 2013 3:00 am

Web Title: revolt in pune mns
टॅग : Mns
Next Stories
1 पुणे विद्यापीठ खून प्रकरणातील आरोपींकडे दाभोलकर यांच्या खुनाबाबत कसून तपास
2 महागाईमुळे ‘पोषण’ घटले
3 औषध खरेदी जादा दराने होणार हे आधीच माहीत होते..
Just Now!
X