19 September 2020

News Flash

नाटक सादर करताना ताळतंत्र हवेच – अरुण नलावडे

मराठी रंगभूमी प्रयोग परिनिरीक्षण मंडळाचे अध्यक्ष या नात्याने ते बोलत होते.

पुणे : नाटक हे समाजामध्ये प्रभावी माध्यम म्हणून ओळखले जाते. मात्र, संहितेनुसार प्रत्यक्ष नाटकाचा प्रयोग सादर होतोच असे नाही. संवादामध्ये होणारे बदल आणि अंगविक्षेपकांना घेतले जाणारे आक्षेप यामुळे समाजात अनुचित प्रकार घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे नाटक सादर करताना ताळतंत्र हवेच, असे प्रतिपादन अरुण नलावडे यांनी बुधवारी केले.

मराठी रंगभूमी प्रयोग परिनिरीक्षण मंडळाचे अध्यक्ष या नात्याने ते बोलत होते. ते म्हणाले की, नाटकातील संवादामध्ये बदल आणि आक्षेपार्ह अंगविक्षेप यांच्या विरोधात दोन-तीन नाटकांसंदर्भात तक्रारी आल्या होत्या. त्यामुळे मंडळाने हा निर्णय घेतला आहे. मंडळाने घालून दिलेल्या नियमावलीचा भंग होत असेल आणि समाजामध्ये अनुचित प्रकार घडण्याची शक्यता असेल तर अशा नाटकांविरुद्ध मंडळाला कारवाई करावीच लागेल, याकडे नलावडे यांनी लक्ष वेधले.

मी नाटकामध्ये काम करणारा कलाकार आहे. कष्ट करून नाटककाराने संहितालेखन केलेले असते याची मला कल्पना आहे. त्यामुळे एखादा ‘बोल्ड’ विषय नाटकातून मांडला असेल तर संबंधित नाटककाराशी चर्चा करून त्याविषयी पर्याय शोधता येऊ शकतात. मात्र, अधिकार आहे म्हणून सरसकट कात्री लावण्याची भूमिकाही घेतली जाणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. नाटक सादर करताना ताळतंत्र हवेच. त्यामुळे सेन्सॉर बोर्ड नकोच या भूमिकेशी मी सहमत नाही, असेही नलावडे यांनी सांगितले.

जुन्या संहितांचे जतन

मराठी रंगभूमी प्रयोग परिनिरीक्षण मंडळाकडे १९५४ पासूनच्या ७० हजार नाटकांच्या संहिता आहेत. त्यापैकी काही संहितांना वाळवी लागली आहे. पण, या दर्जेदार नाटकांचा भावी पिढय़ांना अभ्यास करता यावा या उद्देशातून संहितांचे स्कॅनिंग करून त्या जतन करण्यात येत असल्याचे अरुण नलावडे यांनी सांगितले. मात्र, काही संहितांचे हक्क लेखकांच्या वारसदारांकडे असल्याने त्या विनापरवानगी प्रयोग करण्यासाठी उपलब्ध होतील, याची खात्री देता येत नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 19, 2019 1:53 am

Web Title: rhythm is needed when presenting the play arun nalavade
Next Stories
1 रेल्वे खानपान सेवेवरील देखरेखीत हलगर्जी
2 भावी शासकीय अधिकाऱ्यांना दिलासा
3 साक्षरता वृद्धीसाठीच्या नव्या अभियानाबाबत प्रश्नचिन्ह
Just Now!
X