शहरात अनेक भागात नव्याने तयार करण्यात आलेले रस्ते केबल टाकण्यासाठी 4khodkam1खोदले जात असल्यामुळे सर्वसामान्य पुणेकर अस्वस्थ असतानाच खुद्द महापौर प्रशांत जगताप हे देखील त्यांच्या प्रभागातील खोदकाम थांबवू शकत नसल्याचे सोमवारी स्पष्ट झाले. केबल टाकण्याच्या विरोधात सातत्याने भूमिका घेत असल्यामुळेच माझ्या प्रभागातील नवे रस्ते उखडले जात असल्याचा गंभीर आरोप महापौरांनी सोमवारी केला.
शहरात विविध कामांसाठी खासगी कंपन्यांच्या केबल टाकण्याचे काम सध्या जोरात सुरू असून नव्याने तयार केलेले डांबरी रस्ते केबल टाकण्यासाठी उखडले जात आहेत. तसेच नव्याने तयार केलेले पदपथही उखडले जात असून तेथेही केबल टाकण्याची कामे केली जात आहेत. अनेक संस्था, संघटनांनी तसेच नागरिकांनी आणि लोकप्रतिनिधींनी खोदकामांबाबत तक्रारी केल्या असून लाखो रुपये खर्च करून तयार झालेले रस्ते उखडले जात असल्यामुळे महापालिका सभेतही त्याबाबत आवाज उठवण्यात आला होता. खुद्द महापौरांच्याच प्रभागात नव्याने तयार झालेले रस्ते उखडण्यात आल्याची तक्रार महापौरांनीच सभेत केली होती आणि शहरातील खोदकामे थांबवण्याचे आदेशही त्यांनी दिले होते. त्यानुसार कामे थांबली. मात्र ती पुन्हा सुरू झाली.
शहरातील या खोदकामांबद्दल महापौरांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती. तसेच महापालिका प्रशासन खासगी कंपन्यांच्या दबावाखाली काम करत असल्याचाही आरोप त्यांनी गेल्या आठवडय़ात पत्रकार परिषद घेऊन केला होता. महापौरांनीच हा आरोप केल्यामुळे प्रशासन त्याची दखल घेईल अशी अपेक्षा होती. मात्र तसे काही न घडता उलट महापौरांच्याच प्रभागात गेले दोन दिवस जोरात खोदाई केली जात आहे.

माझ्या प्रभागात अगदी अलीकडेच साडेतीन कोटी रुपये खर्च करून नव्याने रस्ते तयार करण्यात आले होते. ते सर्व रस्ते गेल्या काही दिवसात उखडण्यात आले आहेत. महापालिका प्रशासन खासगी कंपन्यांच्या दबावाखाली काम करत असून पुणे शहर पुन्हा खड्डय़ांच्या दिशेने वाटचाल करत असल्याची टीका मी पत्रकार परिषदेत केली होती. शहरात आणि माझ्या प्रभागात होत असलेल्या रस्ते खोदाईच्या विरोधात मी सातत्याने आवाज उठवत असल्यामुळेच माझ्या प्रभागातील रस्ते खोदण्यात येत आहेत.
– प्रशांत जगताप, महापौर