वारकरी संतांचे जन्मशताब्दी आणि समाधी शताब्दी वर्ष शासकीय वैभवात साजरे करण्याबरोबरच शासनाच्या महापुरुषांच्या अभिवादन यादीत वारकरी संतांचा समावेश करावा, अशी मागणी वारकरी संप्रदायातर्फे रविवारी झालेल्या बैठकीमध्ये करण्यात आली. या मागणीचे निवेदन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह उपमुख्यमंत्री अजित पवार आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना पाठविण्यात आले आहे.

महापुरुषांना अभिवादन करण्यासाठी शासनाकडून दरवर्षी यादी प्रसिद्ध केली जाते. यंदाच्या यादीत शासनाने बाळासाहेब ठाकरे आणि प्रबोधनकार ठाकरे यांच्या नावांचा समावेश केला आहे. संतशिरोमणी नामदेव महाराज यांचे ७५० वे जयंती वर्ष सुरू असतानाही त्यांचे नाव वगळण्यात आले आहे. या संदर्भात खंडूजीबाबा मंदिर येथे झालेल्या  वारकरी संप्रदायिकांच्या बैठकीमध्ये शासकीय महापुरुषांच्या अभिवादन यादीत संतांचा समावेश करावा, अशी मागणी शासनाकडे करण्यात आली. ज्ञानेश्वर महाराजांचे वंशपरंपरागत चोपदार राजाभाऊ  चोपदार, संत एकनाथ महाराज यांचे १४  वे वंशज योगीराज गोसावी पैठणकर, सद्गुरू अमृतानाथस्वामी महाराज संस्थानचे अध्यक्ष पुरुषोत्तम महाराज पाटील-आळंदीकर, संत तुकाराम महाराज संस्थानचे प्रशांत मोरे-देहूकर, संत तुकाराम महाराजांचे वंशज जयसिंग मोरे -देहूकर, आम्ही वारकरी संस्थेचे अध्यक्ष रामभाऊ  चोपदार, कीर्तनकार सचिन पवार, श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा समितीचे अध्यक्ष मारूती ज्ञानोबा कोकाटे  या बैठकीला उपस्थित होते.

यंदाचे वर्ष हे संत ज्ञानेश्वर, संत निवृत्तीनाथ, संत सावतामाळी, संत सोपानकाका आणि संत मुक्ताबाई यांच्या समाधीचे ७२५ वे वर्ष आहे. या संतांच्या समाधीचा सप्तशतकोत्तर रौप्यमहोत्सव आणि संत नामदेव यांचे सप्तशतकोत्तर रौप्यमहोत्सव जयंती वर्ष साजरे करावे, अशी मागणी शासनाकडे करण्यात आली आहे, अशी माहिती सचिन पवार यांनी दिली.