पत्नी आणि मुलीला भेटून बहिणीच्या घरी निघालेल्या संजय साहेबराव शिंदे (३१) याचा रेल्वेच्या धडकेत मृत्यू झाला. ही घटना बुधवारी घडली होती. सदर व्यक्तीची आज ओळख पटली. रेल्वे रुळ ओलांडण्याचा शॉर्ट कट संजयच्या जीवावर बेतला. संजय त्याच्या कुटुंबाचा आधार होता. त्याच्या पाठीमागे आई, वडील, मुलगी, पत्नी असा परिवार आहे.

बुधवारी सायंकाळी संजय मोरवाडीतील लालटोपी नगर येथे पत्नी आणि मुलगी योगेश्वरीला भेटायला आला होता. त्याचे आणि पत्नीचे पटत नसल्याने तो बहिणीकडे तर कधी मित्रांकडे गेल्या तीन महिन्यांपासून रहात होता. पत्नी आणि मुलगी योगेश्वरीला भेटल्यानंतर संजय काळेवाडी येथे रहाणाऱ्या बहिणीकडे जाणार होता.

पिंपरी रेल्वेस्थानकाच्या जवळ रेल्वे रुळ ओलांडत असताना पुणे-मुंबई इन्टरसिटी एक्सप्रेसने संजयला जोरात धडक दिली. संजय जवळपास दहा फूटावर जाऊन पडला. ट्रेनच्या या धडकेत संजयचा जागीच मृत्यू झाला. संजय हा बिगारी काम करायचा तर पत्नी भांडी धुण्याचं काम करून कुटुंब चालवते.

मुलगी योगेश्वरी इयत्ता तिसरीमध्ये असल्याची माहिती नातेवाईकांनी दिली आहे. दरम्यान,या घटनेत शॉर्ट कट मुळे जीव गेल्याचे निदर्शनास आले असून असा शॉर्ट घेऊ नये असे रेल्वे पोलीस एम.एच गायकवाड यांनी आवाहन केले आहे.