News Flash

वाचवलेले तांदूळ गरजूंच्या मुखी…

समाजात परिवर्तन घडवून आणण्यासाठी मोठे कार्यक्रम किंवा उपक्रम करावे लागतात, मोठी चळवळ उभी करावी लागते, त्यामागे नेतृत्व आणि मनुष्यबळही लागते हे खरे असले, तरी एखाद्या

समाजात परिवर्तन घडवून आणण्यासाठी मोठे कार्यक्रम किंवा उपक्रम करावे लागतात, मोठी चळवळ उभी करावी लागते, त्यामागे नेतृत्व आणि मनुष्यबळही लागते हे खरे असले, तरी एखाद्या अगदी छोटय़ा उपक्रमातून किंवा एखाद्या छोटय़ा विचारातून देखील परिवर्तन घडू शकते. असे परिवर्तन प्रत्यक्ष बघायचे असेल, तर अरण्येश्वर परिसरातील सुपर्ण हॉल या मंगल कार्यालयात कधी तरी अवश्य चक्कर मारायला हवी. विवाह समारंभात अक्षता म्हणून होणारा तांदळाचा अपव्यय थांबवून ते तांदूळ गरजूंच्या मुखी देण्याचा उपक्रम या कार्यालयात सुरू झाला आहे आणि नुकतेच या उपक्रमाने एक वर्ष पूर्ण केले.
विवाहाच्या वेळी मंगल कार्यालयात उपस्थित असलेल्या सर्वाना हातात अक्षता दिल्या जातात. प्रत्यक्षात या अक्षता वधू-वरांपर्यंत पोहोचतच नाहीत आणि विवाह लागल्यानंतर मंगल कार्यालयाच्या सभागृहात सर्वत्र अक्षता पडल्याचे चित्र दिसते. अशा प्रकारे दर लग्नात किमान चारपाच किलो तरी तांदूळ अक्षतांच्या रूपाने वाया जातो. हा तांदूळ वाया जाऊ नये यासाठी विवाह समारंभ होत असताना उपस्थितांनी केवळ मंगलाष्टके ऐकावीत आणि तांदळाचा अपव्यय थांबावा, या कल्पनेतून अक्षता वाचवण्याचा उपक्रम सुरू करावा, असा विचार सुपर्ण हॉलच्या जोशी-गोखले परिवाराच्या मनात आला. हा विचार मनात आल्यानंतर मग तेवढय़ावरच न थांबता या परिवाराने हा उपक्रम कार्यालयात राबवायलाही लगेच सुरुवात केली. या उपक्रमाला नुकतेच एक वर्ष पूर्ण झाले.
‘‘अक्षतांच्या रूपाने तांदूळ वाया जातो. शिवाय सभागृहातही सर्वत्र अस्वच्छता होते. तांदळाची नासाडी होते आणि मुख्य म्हणजे संपूर्ण कार्य पार पडेपर्यंत उपस्थित सर्व जण पडलेल्या अक्षतांवरूनच फिरत असतात. विवाह लागल्यानंतर सभागृहात मोठय़ा संख्येने लोक उपस्थित असतात. त्यामुळे सभागृह झाडूनही घेणे शक्य नसते. यावर उपाय म्हणून वधू पक्ष आणि वर पक्ष या दोघांची संमती असेल, तर विवाहात अक्षता न वाटता ते तांदूळ गरजूंना देण्याचा उपक्रम आम्ही सुरू केला. त्याला लोकांकडूनही चांगला प्रतिसाद मिळत आहे. वर्षभरात जेवढे विवाह झाले त्यातील निम्म्या विवाहांमध्ये उभय पक्षांनी आम्हाला संमती दिली,’’ असा अनुभव जोशी-गोखले परिवारातील सदस्य मकरंद गोखले यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितला. विष्णु ऊर्फ भाऊ जोशी आणि मुकुंद  गोखले यांनी मंगलकार्य व्यवस्थापनाच्या या व्यवसायाला १९६३ मध्ये सुरुवात केली. त्यांची पुढची पिढी आता या व्यवसायात आहे.
‘‘आम्ही कोणालाही सक्ती करत नाही किंवा असा उपक्रम करतो हेही सांगत नाही. आम्ही फक्त हॉलमध्ये सभागृहात या उपक्रमाची माहिती देणारी पाटी लावली आहे. ती पाटी वाचून जे उत्सुकता दाखवतात, चौकशी करतात त्यांना आम्ही उपक्रमाची माहिती देतो. तसेच उभय पक्षी चर्चा करून निर्णय घ्या, असेही आम्ही सुचवतो. ज्यांना अक्षता टाकाव्यात असे वाटते, त्यांच्यासाठी व्यासपीठावर अक्षता ठेवलेल्या असतात. तसेच ज्या विवाहात अक्षता वापरायच्या नसतात, अशा विवाहात या उपक्रमाचीही माहिती विवाह समारंभापूर्वी गुरुजी ध्वनिवर्धकावरून देतात,’’ अशीही माहिती गोखले यांनी दिली.
अक्षता वाचवण्याच्या या उपक्रमाचे चांगले स्वागत होत आहे. वाचलेले तांदूळ आमच्या तांदळाची भर घालून आम्ही संस्थांना देतो. ग्रामीण भागात गरजू विद्यार्थ्यांसाठी ज्या संस्था-वसतिगृह सुरू आहेत, त्यांच्यासाठी हे तांदूळ आम्ही देतो. या संस्थांसाठी मदत गोळा करण्याचे काम पुण्यातील हरिओम काका हे सेवाभावी कार्यकर्ते करत असतात. त्यांच्याकडे आम्ही तांदूळ देतो मग ते ग्रामीण भागातील संस्थेला ते देतात किंवा सुपर्ण हॉलमध्ये संस्थांना बोलावून त्यांच्याकडे तांदूळ सुपूर्द करतो, असेही गोखले यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 7, 2016 3:35 am

Web Title: save rice for need person
टॅग : Marriage
Next Stories
1 दुचाकीवर मागे बसणाऱ्याबाबतही हेल्मेटची सक्ती राबविण्याचे आदेश
2 हेल्मेटसक्ती उत्पादक कंपनीच्या फायद्यासाठी राज ठाकरे यांचा आरोप
3 ‘मोबाइल अॅप’च्या माध्यमातून संदीप खरे रसिकांच्या भेटीला
Just Now!
X