21 October 2020

News Flash

विद्यापीठ विभागांची झाकली मूठ..

मानसशास्त्र विभागाचा कारभार तर फक्त विभागप्रमुखांवरच सुरू आहे.

शिक्षणसंस्थांमध्ये असलेल्या सुविधा, शिक्षक संख्या, शुल्क असे तपशील विभागांनी संकेतस्थळावर जाहीर करावेत, असा विद्यापीठाचाच नियम असला तरीही विभागांना मात्र हे नियम पाळण्याची सक्ती नाही. अपवाद वगळता संकेतस्थळावर विभागाचे पूर्ण तपशील देण्यात आलेले नाहीत. मानसशास्त्र विभागाचा कारभार तर फक्त विभागप्रमुखांवरच सुरू आहे.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ हे ख्यातनाम विद्यापीठ. या विद्यापीठाच्या नावामुळे विद्यार्थी येथे प्रवेशासाठी धाव घेतात. प्रवेश घेतल्यानंतर विद्यापीठाच्या विभागांमध्ये प्राथमिक सुविधाही नसल्याचा धक्का विद्यार्थ्यांना पचवावा लागतो. विद्यापीठाच्या अनेक विभागांमध्ये पुरेशी शिक्षक संख्या नाही, अनेक विभागांना पूर्णवेळ प्रमुख नाहीत. मानसशास्त्र विभागाचा कारभार तर आता फक्त विभाग प्रमुखांवरच आहे. हा विभाग पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम चालवतो. विभागातील प्राध्यापकांना मुदतवाढही देण्यात आली नाही आणि नवी पूर्णवेळ पदेही भरण्यात आलेली नाहीत. वृत्तपत्र आणि संज्ञापन विभागाची अवस्थाही अशीच आहे. या विभागातही पुरेसे शिक्षक नाहीत, विभागप्रमुखही पूर्णवेळ नाहीत. दोन पदविका अभ्यासक्रम आणि एक पदवी अभ्यासक्रम या विभागात चालतो. येथे दोनच पूर्णवेळ शिक्षक आहेत. शारीरिक शिक्षण विभागालाही पूर्णवेळ विभागप्रमुख नाहीत.
विद्यापीठाच्याच नियमानुसार सर्व शिक्षणसंस्थांनी आणि महाविद्यालयांनी त्यांच्याकडील सुविधांची माहिती संकेतस्थळावर जाहीर करणे बंधनकारक आहे. विभागात शिक्षक किती आहेत, इतर कोणत्या सुविधा दिल्या जातात असे तपशील देणे आवश्यक आहे. विद्यापीठातील विभागांची माहिती मात्र संकेतस्थळावर उपलब्ध नाही. त्यामुळे प्रत्यक्षात विभागांची अवस्था काय आहे हे विद्यार्थ्यांना प्रवेश घेतल्यावरच लक्षात येते. पुरेशी स्वच्छतागृहे, पिण्याच्या पाण्याची सुविधा, अपंग विद्यार्थ्यांसाठी रॅम्प अथवा लिफ्ट अशा प्राथमिक सुविधाही काही विभागांमध्ये नाहीत.

सुविधा नाहीत, तरीही शुल्क जास्त
विद्यापीठाचा तंत्रज्ञान विभाग पायाभूत सुविधा आणि शिक्षकसंख्येच्या निकषांचीही पूर्तता करत नाही. असे असतानाही एम.टेक किंवा पीएच.डी अभ्यासक्रमासाठी या विभागाचे शुल्क मात्र जास्त आहे. एम.टेक – पीएच.डी या अभ्यासक्रमासाठी १ लाख २० हजार रुपये शुल्क आकारण्यात येते. त्यातील साधारण ४० हजार रुपये हे फक्त पीएच.डी साठी आकारण्यात येतात.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 20, 2016 3:30 am

Web Title: savitribai phule pune university 2
Next Stories
1 शहरात प्रथमच साकारली कवितेची बाग
2 मुरुड दुर्घटनेप्रकरणी आझम कॅम्पसच्या संचालकासह सतरा जणांविरुद्ध गुन्हा
3 राज्य पुरातत्त्व विभाग ८० दुर्ग संवर्धनासाठी ताब्यात घेणार
Just Now!
X