मुलाला शाळेत प्रवेश घेणे, ही पालकांना डोकेदुखीच वाटावी अशी परिस्थिती सध्या आहे. ऑनलाईन- ऑफलाईन फंडे, अर्ज, अटी, नियम, अतिरिक्त शुल्क, मुलाखती, चाचण्या ही प्रवेश प्रक्रियेची लांबलचक मालगाडी अनेकांना धास्तावणारीच आहे. त्यातच बंदी असूनही शाळांमध्ये सर्रास चालणाऱ्या मुलाखती आणि चाचण्या यांनी पालकही जेरीस आले असले, तरी पालकांना वाटणाऱ्या धास्तीच्या भांडवलावर एक नवी बाजारपेठ उभी राहात आहे. ‘मुलाच्या प्रवेशासाठी शाळांमध्ये मुलाखती कशा द्याव्यात,’ यासाठी कार्यशाळा सुरू झाल्या असून हजारोंच्या घरात पालक या कार्यशाळांसाठी शुल्क भरत आहेत.
डिसेंबर ते फेब्रुवारी हा सध्या शाळांच्या प्रवेश प्रक्रियेचा कालावधी म्हणूनच ओळखला जातो. कोणती शाळा चांगली, कोणते शिक्षणमंडळ चांगले, शाळेची प्रवेश प्रक्रिया काय आहे.. असे अनेक प्रश्न पालकांना पडलेले असतात. शाळा प्रवेशाबाबत पालकांमध्ये असणाऱ्या या धास्तीच्या भांडवलावर आता अनेक हुशार व्यावसायिकांनी आपले उखळ पांढरे केले आहे.
शाळा प्रवेशासंबंधीच्या अनेक विषयांवर आता कार्यशाळा, समुपदेशन केंदं्र सुरू झाली आहेत. विशेष म्हणजे कायद्यानुसार शाळांमध्ये मुलाखती घेणे हा गुन्हा असतानाही पालकांनी मुलाखती कशा द्याव्यात यावर सध्या कार्यशाळा सुरू झाल्या आहेत. पुणे आणि मुंबईमध्ये अशा कार्यशाळांची सध्या चांगलीच चलती आहे. मुलाखतींवरच प्रवेश अवलंबून असल्याचे शाळा सांगत असल्यामुळे पालकही अशा कार्यशाळा आणि समुपदेशन केंद्रांकडे धाव घेत आहेत. तासाला अडीच ते तीन हजार रूपये शुल्क मोजून मुलाच्या नर्सरी किंवा पहिलीच्या प्रवेशाची मुलाखत कशी द्यावी याचे मार्गदर्शन पालक घेत आहेत. कल्याणी नगर, कॅम्प या भागांमध्ये असलेली ही मार्गदर्शन केंदं्र सध्या सुरू आहेत. प्रवेशाच्या या कालावधीत शाळा निवडीपेक्षाही मुलाखतीबाबत मार्गदर्शन घेण्यासाठी पालकांचा प्रतिसाद मिळत असल्याचे या व्यावसायिकांनी सांगितले.
शाळा कशी निवडावी, कोणत्या बोर्डाची निवडावी, मुलगा कोणत्या शाळेत रमू शकेल अशा अनेक मुद्दय़ांसाठी समुपदेशनाचा धंदाही जोरात सुरू आहे. शहरातील ‘चांगल्या’ शाळांची यादी विकण्याचा उद्योग काही संकेतस्थळे करत आहेत. पाचशे ते अडीच हजार रुपये भरून शाळांची यादी आणि माहिती या संकेतस्थळांमार्फत पालकांना उपलब्ध करून दिली जाते. या संकेतस्थळांवर नोंदणी करून ‘चांगल्या’ शाळांच्या यादीत झळकण्यासाठी शाळांकडूनही शुल्क घेतले जाते आणि ही यादी पालकांना उपलब्ध करून देण्यासाठी पालकांकडूनही शुल्क घेतले जाते. नर्सरी शाळा किंवा पहिलीच्या मुलाचा कल ओळखून त्याच्यासाठी शाळा सुचवली जात असल्याची जाहिरात या संस्था आणि संकेतस्थळे करत आहेत.

—   
‘मुलाखतींसाठी कार्यशाळा, समुपदेशन वर्ग यावर शिक्षण विभागाचे नियंत्रण असू शकत नाही. मात्र, मुळात शाळांमध्ये मुलाखती होणेच बेकायदेशीर आहे. त्या पाश्र्वभूमीवर विभागीय शिक्षण सहसंचालकांना सूचना देण्यात आल्या आहेत. शाळांमध्ये मुलाखती किंवा चाचण्यांच्या माध्यमातून प्रवेश प्रक्रिया राबवली जाऊ नये, यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे.’
– महावीर माने, प्राथमिक शिक्षण संचालक