‘‘शिल्पकार बी. आर. खेडकर यांच्यासारख्या कलाकाराला पद्म पुरस्कार मिळायला हवा. त्यांना पुरस्कार देणे हा महाराष्ट्राचा सन्मान ठरेल,’’ असे मत खासदार शिवाजीराव अढळराव पाटील यांनी रविवारी ‘शिल्पगौरव पुरस्कार’ प्रदान सोहळ्यामध्ये व्यक्त केले.
शिल्पकार बी. आर. खेडकर प्रतिष्ठानच्यावतीने शिल्पकलेच्या क्षेत्रात आपला ठसा उमटवणाऱ्या व्यक्तींना खेडकर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून दरवर्षी ‘शिल्पगौरव’ पुरस्कार दिला जातो. या वर्षी शिल्पकार प्रमोद कांबळे यांना शिल्पगौरव पुरस्कार देण्यात आला. सन्मानचिन्ह, अकरा हजार रुपये, असे या पुरस्काराचे स्वरूप होते. त्याचबरोबर शिल्पकला, नृत्य अशा विविध कलाप्रकारांमध्ये आपल्या कामाचा ठसा उमटवणारे राजाभाऊ भोसले, बापूसाहेब झांजे, शंकरकुमार, सीताराम कोदे, योगेश कुंभार, संदीप सोनावणे, नृत्यदिग्दर्शक ओंकार शिंदे यांचा सन्मानही या वेळी करण्यात आला. सामाजिक क्षेत्रामध्ये कार्य करणाऱ्या संस्थांचाही सन्मान करण्यात आला. या वेळी बी. आर. खेडकर, आमदार उल्हास पवार, मोहन जोशी, गिरीश बापट, तुकारामभाऊ महाराज, भारती विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. शिवाजीराव कदम, पुणे महानगरपालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष विशाल तांबे, प्रतिष्ठानचे विश्वस्त आणि पदाधिकारी उपस्थित होते.
या वेळी अढळराव म्हणाले, ‘‘स्वत: मोठे कलाकार असतानाही दुसऱ्या कलाकारांचे कौतुक करण्यासाठी मनाचा मोठेपणा लागतो. खेडकर हे कलाकार म्हणून मोठे आहेतच, त्याचबरोबर माणूस म्हणूनही मोठे आहेत. योग्य व्यक्तीचा सन्मान होणे हे खरेतर सन्मान करणाऱ्यासाठी गौरवास्पद असते. अशा व्यक्तींचा गौरव झाला पाहिजे यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. खेडकर यांना ‘पद्म’ पुरस्कार मिळावा यासाठी प्रयत्न करेन.’’