शरद पवार यांचे उद्गार; अरूण साधू यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ कार्यक्रम

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘सिंहासन’ चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान आणि कार्यालय हवे होते. त्यासाठीचा अर्जही करण्यात आला होता. मात्र, प्रशासनाने परवानगी मिळणार नसल्याचे सांगितले. पण, तो निर्णय मी फिरवला. माझ्या अखत्यारित त्यांना चित्रीकरणाची परवानगी दिली आणि एक उत्तम चित्रपट तयार झाला, अशी आठवण माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी सोमवारी सांगितली.‘सिंहासन’ या चित्रपटातून राजकारणाची टिंगल केली होती. मात्र, आमच्या टिंगलीतून सर्वसामान्यांना आनंदाचे चार क्षण मिळत असल्यास आम्ही तेही स्वीकारू,’ असे पवार म्हणाले.

एआरडी एंटरटेन्मेंट, साहित्य प्रसारिणी सभा, आशय फिल्म क्लब आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने पत्रकार आणि साहित्यिक अरूण साधू यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ विशेष कार्यक्रमाचे राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयात आयोजन करण्यात आले होते, त्या वेळी पवार बोलत होते. ज्येष्ठ संपादक आणि खासदार कुमार केतकर, संज्ञान आणि वृत्तपत्रविद्या विभागाच्या प्रमुख उज्ज्वला बर्वे, अरुणा बर्वे आदी उपस्थित होते.

या कार्यक्रमात साधूंच्या स्मृतिप्रीत्यर्थ ग्रंथाली आणि साधूंच्या मित्रपरिवाराच्या वतीने पत्रकारांसाठी पाठय़वृत्तीची घोषणा करण्यात आली. संशोधनात्मक काम करणाऱ्या पत्रकारांना, पत्रकारितेच्या विद्यार्थ्यांना ही शिष्यवृत्ती दिली जाणार आहे. उज्ज्वला बर्वे यांच्या अध्यक्षतेखालील समिती शिष्यवृत्तीसाठी उमेदवाराची निवड करणार आहे. या पाठय़वृत्तीबाबतची अधिक माहिती संज्ञापन आणि वृत्तपत्रविद्या विभागाच्या संकेतस्थळावर जाहीर केली जाणार आहे.‘मुंबई कुणाला उपाशी ठेवत नाही. मुंबई सतत जागृत असते, काम करत असते. अरुण साधूही अचलपूरहून मुंबईला आले. त्यांनी मुंबईकडे वेगळ्या नजरेतून पाहिले आणि मुंबईचे अप्रतिम चित्रण आपल्या साहित्यातून केले. साधूंचे लेखन आजही वाचकांच्या मनात आहे,’ अशी भावना पवार यांनी  व्यक्त केली.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sharad pawar arun sadhu
First published on: 19-06-2018 at 02:22 IST