News Flash

अजून आठवते.. : अनोळखी व्यापाऱ्याने पाकीट दिले.. – रमेश बोडके

शिवसेनेतर्फे तीनवेळा महापालिकेमध्ये नगरसेवक म्हणून काम करण्याची संधी मला मिळाली.

त्या निवडणुकीत मी बोहरी आळीमध्ये प्रचारासाठी गेलो होतो. प्रचार सुरू होता. गाठीभेटी, संपर्क करताना एका अपरिचित बोहरी व्यापाऱ्याने मला दुकानात बोलावून घेतले. ‘बोडके साहेब, तुमचे नाव वृत्तपत्रात वाचतो. चांगले काम करणारे नगरसेवक निवडून आले पाहिजेत’, असे म्हणत व्यापाऱ्याने माझ्या हातामध्ये पाकीट दिले. घरी आल्यानंतर मी ते पाकीट उघडून पाहिले तर, त्यामध्ये चक्क दहा हजार रुपये होते. अर्थात सन २००२ मध्ये दहा हजार ही मोठी रक्कम होती. निवडून आल्यानंतर मी त्या व्यापाऱ्याकडे गेलो आणि त्यांना पेढय़ाचा पुडा दिला. त्या व्यापाऱ्याने आजतागायत माझ्याशी कधी संपर्क साधलेला नाही की कोणतेही काम सांगितले नाही. पण चांगले नगरसेवक निवडून आले पाहिजेत, एवढीच त्याची तळमळ होती.

शिवसेनेतर्फे तीनवेळा महापालिकेमध्ये नगरसेवक म्हणून काम करण्याची संधी मला मिळाली. मी तिसऱ्या वेळेस नगरसेवक झालो तेव्हा तर माझ्यावर प्रभागातील अन्य तीनही उमेदवारांना निवडून आणण्याची जबाबदारी होती. शिवसेनेचा जन्म झालेल्या कसब्यातून मला निवडणूक लढायची संधी लाभली. मी पहिल्यांदा निवडणूक लढविली त्यावेळी काँग्रेसचे बुवा नलावडे आणि नागरी संघटनेचे सुरेश तौर िरगणात होते. त्यामध्ये तौर निवडून आले. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मी काँग्रेसचे रमेश भांड यांच्याविरोधात निवडून आलो. त्यावेळी बुवा नलावडे शेजारच्या वॉर्डातून निवडून आले होते. मात्र, १९९७ मध्ये मी आणि नलावडे अशा दोन विद्यमान नगरसेवकांमध्ये लढत झाली होती. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची टिळक चौकामध्ये जाहीर सभा झाली होती. त्यापूर्वी दुपारच्या वेळी मी त्यांना भेटण्यासाठी गेलो होतो. ‘काय परिस्थिती आहे’, असे बाळासाहेबांनी विचारले तेव्हा ‘मी निश्चितपणे निवडून येईन’, असे मी त्यांना सांगितले. ‘तू पराभूत झालास तर शिवसेनेचा कसा जय होणार,’ असे बाळासाहेब म्हणाले होते. त्या वेळी पत्नी जयश्री हिने माझ्या प्रचारासाठी दीड हजार महिलांचा सहभाग असलेली मिरवणूक काढली होती.

महापालिकेच्या २००२ मध्ये प्रभाग पद्धतीने झालेल्या निवडणुकीत माझ्यासह शिवसेनेचे रवींद्र धंगेकर, विजय मारटकर आणि भाजपच्या मालती काची असे आम्ही चार उमेदवार होते. मी पावणेचार हजारांच्या मताधिक्याने विजयी झालो. धंगेकर विरुद्ध बुवा नलावडे या चुरशीच्या लढतीमध्ये धंगेकर १६० मतांनी विजयी झाले होते. त्या वेळी मी धंगेकर यांना बरोबर घेऊन फिरलो होतो. ‘एक वेळ मला मत नका देऊ. पण, रवींद्रला मतदान अवश्य करा,’ असे आवाहन मी मतदारांना केले होते. त्यामुळे तुल्यबळ लढत होऊनही आमच्या पॅनेलचे चारही उमेदवार विजयी झाले होते.

शब्दांकन : विद्याधर कुलकर्णी

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 10, 2017 3:20 am

Web Title: shiv sena pune corporator ramesh bodke interview
Next Stories
1 लोक मतदान का करत नाहीत..?
2 शहरबात पुणे : विकास आराखडा झाला, आता अंमलबजावणी हवी
3 पेट टॉक : प्राणी जपणूक मोबाइलवरूनही
Just Now!
X