पिंपरी-चिंचवडच्या सांगवी पोलीस ठाण्याच्या हद्दीत एकाच दिवशी चार बलात्कार आणि लैंगिक अत्याचाराचे गुन्हे दाखल झाले आहेत. सर्वच पोलीस स्थानकात याविषयी चर्चा सुरू आहे. लग्नाचे अमिष दाखवून एका ४२ वर्षीय महिलेवर तसेच दोन अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार झाला तर एका अल्पवयीन मुलीवर जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केल्याने ती गर्भवती राहिली असल्याचा गुन्हा दाखल झाला आहे.

सांगवी पोलिस ठाण्याच्या हद्दीत बाललैंगिक अत्याचार करणाऱ्या गणेश मारुती मस्के, हरी गोविंद राठोड, अजय या तिघांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तर संतोष महाले याच्या विरोधात फसवणूक आणि बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामधील पीडित महिलेचे वय ४२ वर्षे तर इतर मुलींचे १४, १६, १७ अशी वय आहेत. ४२ वर्षीय महिलेची ६ लाख ५० हजार रुपये आणि एक १६ हजार रुपयांचा मोबाईल अशी फसवणूक देखील केली आहे. महिला अत्याचाराच्या घटना आणि एकाच दिवशी सांगवी पोलिस ठाण्यात दाखल झालेल्या गुन्ह्यांमध्ये परिसरात खळबळ उडाली आहे. यातील आरोपींना अटक करण्यासाठी पोलीस तपास करत आहेत, अशी माहिती सांगवी पोलिसांनी दिली आहे.

गेल्या महिन्यात ७ जानेवारीला वडिलांनी १६ वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार केला होता. तर १२ जानेवारीला जवळच्या नातेवाईकाने १४ वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार केला होता. त्यामुळे नातेवाईक किंवा घरातील व्यक्तींच्या वासनेचे बळी अल्पवयीन मुली पडत आहेत. बऱ्याच वेळेस पोलीस स्थानकात गुन्हा दाखल केला जातो. परंतु तो वैयक्तिक पातळीवर तडजोड झाल्यानंतर गुन्हे मागे घेतले जातात. तर काही ठिकाणी पीडित मुलीच्या घरच्यांना जीवे मारण्याची धमकी दिली जाते. त्यामुळे पीडित मुली याची तक्रार आपल्या घरच्यांकडे करत नाहीत आणि याला बळी पडतात. अशा घटना प्रेमसंबंध, ओळख, लग्नाचे आमिष, सोशल मीडिया यामधून पाहायला मिळतात. यासाठी मुलींनी सतत सावध राहायला पाहिजे, जेणेकरून आपल्यावर अशी वेळ येणार नाही.