पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये (पिफ) यंदा प्रथमच ‘पिफ बझार’ ही संकल्पना साकारण्यात येणार असून प्रसिद्ध अभिनेत्री स्मिता पाटील हिच्या स्मरणार्थ साकारण्यात येणारे ‘स्मिता पाटील पॅव्हेलियन’ हे खास आकर्षण असेल. १४ ते २१ जानेवारी या कालावधीत हा महोत्सव होणार आहे.
स्मिता पाटील ही मूळची पुण्याची होती. तिचे शिक्षण पुण्यामध्येच झाले होते. यंदाच्या महोत्सवामध्ये स्मिताची स्मृती जागविण्यासाठी स्मिता पाटील पॅव्हेलियन साकारण्यात येणार आहे. पिफ बझारमध्ये महोत्सवाच्या प्रायोजकांचे स्टॉल्स असतील. त्याचबरोबरीने चित्रपटाशी संबंधित कार्यशाळा आणि चर्चासत्रांचे आयोजन करण्यात येणार आहे. या क्षेत्राशी निगडित असलेल्या विद्यार्थ्यांना स्वतंत्र असे व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात आले असून ते आपली कला सादर करू शकतील. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय क्षेत्रातील नावाजलेले चित्रपट माध्यमातील दिग्गज येथे संवाद साधणार आहेत, अशी माहिती महोत्सवाचे संचालक डॉ. जब्बार पटेल यांनी शनिवारी दिली.
महोत्सवातील जागतिक चित्रपट स्पर्धेमध्ये विविध देशांतील तब्बल एक हजार चित्रपटांनी सहभाग नोंदविला होता. त्यापैकी १४ चित्रपटांची अंतिम फेरीसाठी निवड करण्यात आली आहे. याच १४ चित्रपटांतून सवरेत्कृष्ट चित्रपटास महाराष्ट्र शासनाचा ‘प्रभात उत्कृष्ट आंतरराष्ट्रीय चित्रपट पुरस्कार’ आणि दिग्दर्शकास ‘प्रभात उत्कृष्ट आंतरराष्ट्रीय दिग्दर्शक पुरस्कार’ प्रदान करण्यात येणार आहे. प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एका चित्रपटासदेखील पारितोषिकाने गौरविण्यात येणार असल्याचेही पटेल यांनी सांगितले.