बाणेर रस्त्यावर मंगळवारी सायंकाळी वकिलावर झालेल्या प्राणघातक हल्ल्याच्या निषेधार्थ शनिवारी पुकारण्यात आलेल्या कामबंद आंदोलनाला जिल्ह्य़ात चांगला प्रतिसाद मिळाला. या आंदोलनामध्ये शिवाजीनगर न्यायालय आणि तालुका न्यायालयातील वकिलांनी सहभाग घेतला.
गेल्या मंगळवारी अ‍ॅड. आशिष अर्जुन ताम्हाणे (वय २६, रा. शिवसागर हॉटेलमागे, बाणेर) यांच्यावर हल्ला झाला होता. त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून समीर बाबुरान चांदेरे, किरण बाबुराव चांदेरे, गणेश इंगवले, मनोज इंगवले व त्यांच्या एका साथीदाराविरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुणे बार असोसिएशनने आरोपींना लवरात लवकर अटक करण्याची मागणी करून हल्ल्याच्या निषेधार्थ जिल्ह्य़ातील सर्व वकिलांनी न्यायालयीन कामकाजात सहभागी होऊ नये, असे अवाहन केले होते. ‘कामबंद आंदोलनास वकिलांनी उत्सफूर्त प्रतिसाद देऊन शांततेत आंदोलन करण्यात आले. त्याचबरोबर पक्षकारांची गैरसोय होऊ नये याची दक्षता घेण्यात आली होती,’ अशी माहिती पुणे बार असोसिएशनचे अध्यक्ष राजेंद्र उमाप यांनी केली. आरोपींना तत्काळ अटक करून त्यांच्यावर कडक कलम लावण्याची मागणी त्यांनी केली.