दहावी आणि बारावीच्या उत्तरपत्रिकांच्या छायाप्रतींबरोबर राज्यमंडळाने त्यांच्या मॉडेल उत्तरपत्रिकाही उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी करण्यात येत आहे.
माहिती अधिकारांतर्गत दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना निकालानंतर त्यांच्या उत्तरपत्रिकांच्या छायाप्रती उपलब्ध करून देण्याचा निर्णय राज्यमंडळाने गेल्या वर्षीपासून अमलात आणला आहे. मात्र मिळालेल्या उत्तरपत्रिकेतील गुण कोणत्या आधारे दिले गेले हे विद्यार्थ्यांना कळत नाही. त्यामुळे राज्यमंडळाने मॉडेल उत्तरपत्रिकाही उपलब्ध करून द्याव्यात अशी मागणी करण्यात येत आहे.
यापूर्वीही राज्य मंडळाकडे अशा प्रकारची मागणी झाली होती. त्या वेळी मंडळाने ‘मॉडेल उत्तरपत्रिका या गोपनीय असल्यामुळे, त्या उपलब्ध करून देता येणार नाहीत’ असे उत्तर दिले होते. मात्र, अशाप्रकारे मॉडेल उत्तरपत्रिका उपलब्ध करून देण्याबाबत सर्वोच्च न्यायालयानेही निकाल दिला आहे. त्या निर्णयाच्या आधारे माहिती अधिकारात करण्यात आलेल्या अर्जाला उत्तर म्हणून अशाप्रकारे मॉडेल उत्तरपत्रिका राज्यमंडळाने उपलब्ध करून दिली आहे. यापुढे माहिती अधिकारात उत्तरपत्रिकाच्या छायाप्रतीसाठी बरोबरच त्या विषयाची मॉडेल उत्तरपत्रिका देण्यात यावी अथवा उत्तरपत्रिका मंडळाच्या संकेतस्थळावर जाहीर करण्यात याव्यात. भाषा विषयांचे गुण हे काही प्रमाणात उत्तरपत्रिका तपासणाऱ्या शिक्षकावर अवलंबून असतात. मात्र, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, गणित, जीवशास्त्र या विषयांच्या मॉडेल उत्तरपत्रिका छायाप्रतींबरोबर देण्याची मागणी सजग नागरिक मंचातर्फे करण्यात आली आहे, अशी मागणी सजग नागरिक मंचाकडून करण्यात आली आहे. याबाबत राज्य मंडळाने निर्णय घेतला नसल्याचे, राज्य मंडळाचे अध्यक्ष गंगाधर मम्हाणे यांनी सांगितले.