पीएमपीतर्फे तिकीटदराची आकारणी टप्पा (स्टेज) पद्धतीनुसार केली जात असल्यामुळे छोटय़ा अंतरात प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठा आर्थिक फटका बसत असून ही पद्धत रद्द करून किलोमीटर नुसार दराची आकारणी करावी, अशी आग्रही मागणी पुण्यातील सव्वीस स्वयंसेवी संस्थांनी एकत्र येऊन केली आहे.
पीएमपी प्रवासी मंचचे जुगल राठी, तसेच विवेक वेलणकर, डॉ. विश्वंभर चौधरी, मारुती भापकर, राजेंद्र सिधये यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. पीएमपीच्या दररचनेसाठी टप्पा (स्टेज) पद्धत बंद करावी, दरआकारणी किलोमीटरप्रमाणे करावी आणि पहिल्या टप्प्याचे तिकीट पाच किलोमीटरसाठी पाच रुपये करावे, या मुख्य मागण्या स्वयंसेवी संस्थांनी केल्या आहेत. पीएमपीच्या टप्पा पद्धतीमुळे अतिशय जवळच्या अंतरासाठी म्हणजे एक ते दोन किलोमीटरसाठी देखील दहा रुपये द्यावे लागत आहेत. छोटय़ा प्रवाशांना त्यामुळे फटका बसत असून प्रवासीसंख्या मोठय़ा प्रमाणावर कमी होण्याचेही ते एक कारण आहे, असे राठी यांनी सांगितले.
टप्पा पद्धतीऐवजी किलोमीटर प्रमाणे दर आकारणी करावी आणि पहिल्या पाच किलोमीटपर्यंत पाच रुपये असा दर ठेवावा, म्हणजे प्रवासीसंख्येतही वाढ होईल. कमी अंतरात प्रवास करणाऱ्या प्रवाशांना जादा आर्थिक भार पडता कामा नये, असे सूत्र ठेवल्यास प्रवासी या सेवेकडे वळतील, असे डॉ. चौधरी म्हणाले. दुचाकी आणि रिक्षा प्रवासाला येणाऱ्या खर्चाचा विचार करता पीएमपीचे तिकीट दर सध्या अधिक आहेत. वास्तविक, सर्वसामान्यांना ही सेवा सक्षमरीत्या आणि स्वस्तात उपलब्ध असणे गरजेचे असताना ही सेवा अधिकच महाग होत आहे, याकडेही संस्थांनी लक्ष वेधले आहे.
पीएमपीच्या तिकिटांची फेररचना किलोमीटरनुसार करावी या मागणीसाठी सर्व सव्वीस स्वयंसेवी संस्था एकत्रित येऊन काम करणार असून मागणी मान्य होण्यासाठी लोकशाही मार्गाने आंदोलनही केले जाणार आहे. पाच किलोमीटर पर्यंतच्या अंतराचे वर्तुळमार्ग सुरू करण्याचीही मागणी संस्थांनी केली आहे.