आपल्या अलौकिक स्वरांनी रसिकांना मंत्रमुग्ध करणारे किराणा घराण्याचे ज्येष्ठ गायक स्वरभास्कर पं. भीमसेन जोशी यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ देण्यात येणाऱ्या स्वरभास्कर पुरस्काराचा महापालिकेला विसर पडला आहे. मात्र, सहा महिन्यांनंतरही अजून या पुरस्काराची घोषणा बाकी आहे. तर, दोन वर्षांपूर्वी ज्येष्ठ तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांना जाहीर झालेला स्वरभास्कर पुरस्कार अद्याप प्रदान करण्यात आलेला नाही.

ख्याल गायकी आणि अभंग-भजन गायनामुळे रसिकांच्या मनात घर करून राहिलेले पं. भीमसेन जोशी यांचे २४ जानेवारी २०११ रोजी निधन झाले. त्यांची स्मृती जतन करण्याच्या उद्देशातून पुणे महापालिकेने पर्वती दर्शन परिसरात पं. भीमसेन जोशी कलादालनाची उभारणी केली. या अलौकिक प्रतिभेच्या स्वरभास्कराला अभिवादन करण्याच्या उद्देशातून संगीत क्षेत्रातील ज्येष्ठ कलाकाराला स्वरभास्कर पुरस्कार सुरू करण्यात आला. त्यासाठी महापालिका अर्थसंकल्पात पाच लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. या पुरस्कारासाठी निवड समितीमध्ये महापौर, उपमहापौर, गटनेते यांच्यासह सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवरांचा समावेश आहे. पं. भीमसेन जोशी यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून ४ फेब्रुवारी रोजी या पुरस्काराची घोषणा केली जाते. मात्र, महापालिका निवडणुकीची धामधूम आणि आचारसंहिता यामुळे या वर्षीचा स्वरभास्कर पुरस्कार जाहीर करण्याचे राहून गेले. महापालिकेमध्ये सत्ताबदल झाला असून भारतीय जनता पक्षाकडे शहराचे कारभारीपद आल्यानंतर सहा महिने उलटून गेले, तरी स्वरभास्कर पुरस्कार जाहीर झालेला नाही.

गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांना ज्येष्ठ कथक नृत्यांगना सितारादेवी यांच्या हस्ते २०११ मध्ये पहिला स्वरभास्कर पुरस्कार प्रदान करण्यात आला होता. त्यानंतर ज्येष्ठ संतूरवादक पं. शिवकुमार शर्मा, ज्येष्ठ कथकसम्राट पं. बिरजू महाराज आणि किराणा घराण्याच्या ज्येष्ठ गायिका डॉ. प्रभा अत्रे यांना हा पुरस्कार प्रदान केला आहे.

‘स्वरभास्कर पुरस्कार सुरू करण्याचा आग्रह मी धरला होता. पुरस्कारासाठी कलाकाराची निवड करण्याच्या समितीमध्ये स्थानिक नगरसेवक म्हणून माझा समावेश केला होता. मात्र, अचानक मला त्या समितीतून वगळण्यात आले. मी असावे हा आग्रह नसला, तरी हा पुरस्कार वेळच्या वेळी प्रदान केला जावा,’ असे नगरसेवक आबा बागूल यांनी सांगितले.