पुणे : शहरासह जिल्ह्य़ात स्वस्त धान्य दुकानांमध्ये आणि खुल्या बाजारातही धान्याचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. त्यामुळे नागरिकांनी किराणा मालाच्या दुकानांमध्ये गर्दी करु नये, असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून आणि विभागीय आयुक्तालयाकडून करण्यात आले आहे. पुणे जिल्ह्य़ासह विभागातील इतर चार जिल्ह्य़ांमध्येही पुरेसा धान्यसाठा उपलब्ध आहे.

पुणे विभागात पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर अशा पाच जिल्ह्य़ांत दोन कोटी ३४ लाख ४९ हजार ४९ लोकसंख्या असून त्यापैकी सार्वजनिक वितरण व्यवस्थेमार्फत यापैकी ४७.९५ टक्के लोकसंख्येला अन्नधान्य वाटप केले जाते. सध्या सार्वजनिक वितरण व्यवस्थेमार्फत वितरणासाठी एक लाख ९९ हजार ६२५.८९ मेट्रिक टन (प्रति शिधापत्रिका ३५ किलोनुसार) धान्य उपलब्ध आहे. खुल्या बाजारातील धान्याची उपलब्धता एक लाख नऊ हजार २८५.३१ मेट्रिक टन आहे.

दरम्यान, पीएमपीच्या २३ मार्च रोजी २१ हजार ६०३ फेऱ्यांपैकी २० हजार ३४५ फेऱ्या रद्द केल्या होत्या. एक हजार २५८ फेऱ्यांमध्ये एकूण दहा हजार ४४१ प्रवाशांनी प्रवास केला.

सद्य:स्थितीत केवळ अत्यावश्यक सेवांसाठी पीएमपीच्या फेऱ्या सुरू ठेवण्यात आल्या आहेत. एसटी बसगाडय़ा यापूर्वीच बंद करण्यात आल्या आहेत. याबरोबरच देशांतर्गत विमानवाहतूकही बंद करण्यात आली आहे. मात्र, २३ मार्च रोजी ५८ विमानांद्वारे तीन हजार १८४ प्रवासी पुण्यात आले. तर, २४ मार्चला दुपारी एक वाजेपर्यंत २२ विमाने पुण्यात आली.

या विमानांतून एक हजार ३७० प्रवासी आले आहेत. यापैकी चार जणांना स्वत:च्या घरीच विलग होऊन राहण्याच्या (होम क्वारेंटाइन) सूचना देण्यात आल्या आहेत.

या प्रवाशांपैकी कोणालाही सध्या विलगीकरण कक्षात पाठवण्यात आलेले नाही. करोना रुग्णांच्या सर्वेक्षणांतर्गत शहरासह जिल्हाभरात मंगळवापर्यंत (२४ मार्च) दोन लाख ६० हजार ५६३ घरांमधील अकरा लाख दोन हजार २०३ व्यक्तींचे सर्वेक्षण झाले आहे. त्यांपैकी संदर्भीत केलेल्या व्यक्तींची संख्या १३७ एवढी आहे.

वैद्यकीय आपत्कालीन सहाय्यासाठी हेल्पलाईन क्रमांक

  •  ससून सवरेपचार रुग्णालय – १८००२३३४१२०
  •   पिंपरी चिंचवड मनपा – ८८८८००६६६६
  •  भोसरी रुग्णालय – ९५५२५७८७३१
  •  वायसीएम रुग्णालय – ०२०-६७३३२२२२ आणि ०२०-२७४२३४५६
  •  राज्य शासन नियंत्रण कक्ष – ०२०-२६१२७३९४
  •  राज्य शासन हेल्पलाइन – १०४
  • आयडीएसपी – १८००२३३४१३०
  •  नायडू रुग्णालय – ०२०-२५५०६३०४ आणि ०२०-२५५०६३१७
  •  पुणे मनपा (आपत्ती व्यवस्थापन) – ०२०-२५५०६८००
  •  जिल्हाधिकारी कार्यालय (आपत्ती व्यवस्थापन) – ०२०-२६१२३३७१ (टोल फ्री १०७७)
  •  जिल्हाधिकारी कार्यालय पुरवठा शाखा – ०२०-२६१२३७४३ आणि ९४२०७५६७६०
  • अन्न व औषध प्रशासन हेल्पलाईन क्रमांक – १८००२२२३६५