News Flash

विद्यार्थ्यांच्या सुंदर हस्ताक्षरासाठी शाळांमध्ये होणार प्रयत्न

पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील महापालिकेच्या शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचे हस्ताक्षर सुंदर व्हावे यासाठी दोन्ही शिक्षण मंडळांनी प्रयत्न सुरू केले अाहेत.

पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील महापालिकेच्या शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचे हस्ताक्षर सुंदर व्हावे यासाठी दोन्ही शिक्षण मंडळांनी प्रयत्न सुरू केले असून, लवकरच पुणे व पिंपरीतील शाळांमध्ये प्रायोगिक तत्त्वावर सुंदर हस्ताक्षरासाठीचे वर्ग सुरू केले जाणार आहेत. मराठी भाषा संवर्धन समिती आणि महापालिका शिक्षण मंडळांच्या माध्यमातून ही योजना राबवली जाईल.
दरवर्षी २३ जानेवारी हा दिवस ‘जागतिक हस्ताक्षरदिन’ म्हणून साजरा केला जातो. त्याची सुरुवात १९७७ मध्ये झाली. अमेरिकेतील राजकीय नेते जॉन हॅन्कॉन्क यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने हा दिवस साजरा करण्यास सुरुवात करण्यात आली. हॅन्कॉन्क यांची स्वाक्षरी सुंदर होती आणि त्यातूनच ‘पेनमेनशिप’ या संघटनेमार्फत त्यांच्या स्वाक्षरीद्वारे हस्ताक्षराचे महत्त्व पटावे म्हणून चळवळ राबवली गेली. हस्ताक्षराचे महत्त्व अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. तीनशेसाठ वर्षांपूर्वा समर्थ रामदासांनीही दासबोधाच्या १९व्या दशकातील पहिला समास लेखनक्रिया निरुपणावर लिहिला आहे. त्यात त्यांनी अक्षर कसे असावे या अनुषंगाने ओव्या लिहिल्या आहेत. त्यांनी लिहिल्याप्रमाणे हस्ताक्षर सुंदर असेल तर ते वाचण्याचा, बघण्याचा मोह सहजच होतो. त्याबरोबरच अक्षर न समजल्यामुळे जे घोटाळे होतात तेही टळू शकतात. सुंदर हस्ताक्षरामुळे विद्यार्थ्यांचे परीक्षेतील गुणही वाढतात.
सुंदर हस्ताक्षराचा प्रचार आणि प्रसार करणारे तसेच असे विद्यार्थी घडविणारे शैलेश जोशी यांनी सांगितले, की, हस्ताक्षरदिन म्हणजे केवळ निमित्त आहे. या दिवसापासून आपल्या हस्ताक्षराचे अवलोकन करण्याची आणि ते सुधारण्यासाठी प्रयत्न करण्यासाठी प्रोत्साहन देणारी एक संधीदेखील असू शकते. सुंदर हस्ताक्षर असेल तर त्याचा चांगला परिणाम चेतासंस्थांवर होऊन मन प्रसन्न राहण्यास मदत होते, असे संशोधनदेखील झाले आहे.
सुंदर हस्ताक्षरासाठीचे तंत्र समजून घेण्याबरोबरच सराव आणि थोडीशी मेहनत केली तर चांगले अक्षर घडवणे सहज शक्य होते. महापालिका शाळांमधील विद्यार्थ्यांचे हस्ताक्षर चांगले व्हावे म्हणून आता जोशी यांनी प्रयत्न सुरू केले असून, लवकरच या प्रयत्नांना मूर्त स्वरूप येणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 23, 2016 3:25 am

Web Title: today is the world handwriting day
Next Stories
1 वाचनवेडय़ाचे आगळे संकेतस्थळ
2 ‘कारभारी’ म्हणतात, पिंपरी-चिंचवडचा यापुढे विस्तार नको!
3 बाळांमध्ये योनीमार्ग चिकटलेला असण्याच्या तक्रारीबाबत पालकांमध्ये जागृती नगण्य!
Just Now!
X