भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्यावर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सहप्रभारी श्यौराज वाल्मीकी यांनी तिखट शब्दात हल्लाबोल केला. माजी पंतप्रधान अटलबिराजी वाजपेयी यांच्यापासून ते मोदीपर्यंतच्या भाजपच्या बडय़ा नेत्यांच्या वाडवडिलांचा उद्धार करून त्यांचे देशासाठी काय योगदान आहे, असेही ते घसरले. राहुल गांधी हेच काँग्रेसच्या पंतप्रधानपदाचे उमेदवार असून २०१४ च्या निवडणुकीत राहुल यांना पंतप्रधान करण्यासाठी कार्यकर्त्यांनी संकल्प करावा, घरात न बसता कामाला लागावे, असे आवाहनही केले.
राहुल गांधी यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जाणारे वाल्मीकी प्रथमच शहरात आले होते. महिला काँग्रेसच्या शहराध्यक्षा ज्योती भारती यांनी आयोजित केलेल्या महिला मेळाव्यात ते बोलत होते. माजी मंत्री शोभा बच्छाव, शहराध्यक्ष भाऊसाहेब भोईर, प्रदेश सचिव सचिन साठे आदी उपस्थित होते.
वाल्मीकी म्हणाले, कल्याणसिंह, नितीन गडकरी, लालकृष्ण अडवानी, अटलबिहारी वाजपेयी, नरेंद्र मोदी यांच्यापैकी कुणाच्या वडिलांचे देशासाठी काय योगदान आहे. भाजपमधील कार्यकर्त्यांना तरी त्यांची नावे माहिती आहेत का. याउलट, गांधी-नेहरू घराण्याची परंपरा पहा. मोतीलाल नेहरू, जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी यांनी देशासाठी त्याग, बलिदान केले. पंतप्रधान होण्यासाठी कित्येकजण आसुसलेले असताना संधी असूनही सर्वोच्च पदाचा त्याग करण्याची िहमत फक्त सोनिया गांधी यांनीच दाखवली. गरीब, राज्यघटना, मुस्लिम व दलित यांचा भाजप शत्रू असून त्यांनी अन्नसुरक्षा कायद्याची कुचेष्टा केली. कायम रक्तरंजित राजकारण करणारे, अडवाणींसारख्या गुरूलाही भस्मसात करणारे नरेंद्र मोदी म्हणजे भस्मासुर आहेत. ते कधीही देशाचे पंतप्रधान होऊ शकत नाहीत. संघाने आतंकवाद जन्माला घातला. भाजपचा पंतप्रधान व उत्तर प्रदेशात मुख्यमंत्री असताना रामाची आठवण त्यांना झाली नाही. मात्र, सत्तेतून पायउतार होताच त्यांची रामलल्लाची घोषणा सुरू होते. राष्ट्रवादीशी काँग्रेसने मैत्री केली. मात्र, त्यांचे व्यवहार मैत्रीसारखे नाहीत. मुख्यमंत्री प्रामाणिक तर प्रदेशाध्यक्ष विद्वान आहेत. पैशावाल्यांना पदे दिली, असे आता काँग्रेसमध्ये होणार नाही. कार्यकर्ते मजबूत आहेत. मात्र, त्यांची कदर केली जात नाही. खोटीनाटी माहिती देऊन आपली कोणीही दिशाभूल करू शकत नाही. िपपरीतील महत्त्वाच्या अनधिकृत बांधकामासंदर्भात मुख्यमंत्र्यांसह २१ जणांचे शिष्टमंडळ राहुल गांधी यांना भेटेल व दिलासा देणारा निर्णय तेथे होईल, असे ते म्हणाल
‘पेपरबाजी करू नका; पक्षशिस्त पाळा’
महिला मेळावा व पदाधिकाऱ्यांच्या बैठकीच्या निमित्ताने काँग्रेसमधील गटबाजीचे वाल्मीकी यांच्यासमोर नको इतके प्रदर्शन घडले.
शहराध्यक्ष भाऊसाहेब भोईर एकीकडे तर त्यांचे पक्षांतर्गत विरोधक दुसरीकडे, असे चित्र होते. एकमेकांवर कुरघोडी करण्याची संधी त्यांनी सोडली नाही. वाल्मीकी यांचे वागणे कधी भोईरांच्या बाजूने कधी विरोधी गटाची बाजू घेतल्यासारखे होते. पेपरबाजी करू नका, पक्षशिस्त मोडू नका, अन्यथा पक्षातून बाहेर जावे लागेल. कामचुकारांना हाकलून द्या व काम करणाऱ्यांना संधी द्या, अशी सूचक तंबी त्यांनी दिली.
—
संग्रहित लेख, दिनांक 4th Nov 2013 रोजी प्रकाशित
‘घरात बसू नका, कामाला लागा; राहुल गांधींना पंतप्रधान करण्याचा संकल्प करा’
अटलबिराजी वाजपेयी यांच्यापासून ते मोदीपर्यंतच्या भाजपच्या बडय़ा नेत्यांच्या वाडवडिलांचा उद्धार करून त्यांचे देशासाठी काय योगदान आहे,अशा तिखट शब्दात वाल्मीकी यांनीहल्लाबोल केला.
First published on: 04-11-2013 at 02:36 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Try hard so as to become rahul gandhi as pm walmiki