पुण्यातील मराठा विचार मंथन बैठकीसाठी खासदार उदयनराजे येणार होते. त्या संदर्भात माझे त्यांच्याशी बोलणे देखील झाले होते, पण ते आले नाही. आता काही वेळापूर्वीच उदयनराजे यांच्या सोबत माझे पुन्हा बोलणे झाले असून, येत्या आठवड्यातभरात सातारा येथे स्वतः उदयनराजे बैठक घेणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. अशी माहिती शिवसंग्राम संघटनेचे संस्थापक अध्यक्ष विनायक मेटे यांनी दिली. उदयनराजे बैठकीस न आल्यामुळे विचारण्यात आलेल्या प्रश्नास उत्तर देताना ते बोलत होते. तसेच, या बैठकीत घेण्यात आलेल्या २५ ठरावांची दखल राज्य सरकारने न घेतल्यास आंदोलनाचा देखील इशारा देण्यात आला आहे.

यावेळी विनायक मेटे म्हणाले की, मराठा समाजाच्या आरक्षणाच्या बैठकीत आज दिवसभरात अनेक मुद्द्यांवर चर्चा झाली. या बैठकीत एकूण २५ ठराव करण्यात आले. या ठरावाची दखल राज्य सरकारने न घेतल्यास समाज १ नोव्हेंबर पासून रस्त्यावर उतरणार असल्याचा इशाराही त्यांनी यावेळी दिला.

मराठा आरक्षणाला न्यायालयाने स्थगिती दिल्या प्रकरणी राज्यातील मराठा समाजात संतापाची लाट असून त्या पार्श्वभूमीवर अनेक ठिकाणी मराठा क्रांती समन्वयक पदाधिकाऱ्यांच्या बैठका होत आहेत. त्याच पार्श्‍वभूमीवर आज पुण्यात शिवसंग्राम संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आमदार विनायक मेटे यांच्या अध्यक्षतेखाली मराठा विचार मंथन बैठक झाली.

या बैठकीला राज्यातील अनेक नेत्यांना निमंत्रण देण्यात आले होते. त्यामध्ये छत्रपती उदयनराजे आणि शिवेंद्रराजे यांना स्वतः विनायक मेटे यांनी निमंत्रण दिले होते. यामुळे या बैठकीकडे सर्वांचेच लक्ष लागून होते. मात्र या दोन्ही नेत्यांनी बैठकीकडे पाठ फिरवल्याचे दिसून आले.