News Flash

‘यूपीएससी’ यशोगाथा: ‘मी ‘शुभम’ नसून ‘शेख’ आहे, हे आता गर्वाने सर्वांना सांगू शकतो’

अन्सर शेख याने आपले पदवीपर्यंतचे शिक्षण पुण्याच्या फर्ग्युसन महाविद्यालयातून पूर्ण केले.

मला माझे नाव लपविण्याची गरज भासणार नाही. मी शुभम(हिंदू) नसून शेख(मुस्लिम) असल्याचे आता सर्वांना सांगू शकतो'

प्रतिकूल परिस्थितीवर मात करून २१ वर्षीय अन्सर अहमद शेख या एका रिक्षाचालकाच्या मुलाने पहिल्याच प्रयत्नात यूपीएससी परीक्षेत यश प्राप्त केले आहे. याचा आनंद देखील त्याने साजरा केला, पण परीक्षेसाठी त्याला आपले मुस्लिम आडनाव काही काळासाठी लपवावे लागले होते, याची खल त्याच्या मनात अजूनही कायम आहे.

मूळच्या जालनाच्या शेडगावमधील अन्सर शेख याने आपले पदवीपर्यंतचे शिक्षण पुण्याच्या फर्ग्युसन महाविद्यालयातून पूर्ण केले. राज्यशास्त्र विषयातील पदवी घेतानाच यूपीएससीचा अभ्यासही सुरू होता. पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्याला शहरात राहण्यासाठी वसतीगृह शोधावे लागले. पण तो मुस्लिम असल्याने त्याला घर मिळानासे झाले होते.

‘माझ्या सर्व हिंदू मित्रांची सहजगत्या राहण्याची आणि जेवणाची सोय झाली होती. पण मी मुस्लिम असल्याने अडचणींना सामोरे जावे लागले. त्यामुळे पुढील वेळेस मला माझे नाव शुभम असल्याचे सांगून घर मिळवावे लागले. खरंतर ते माझ्या मित्राचे नाव होते. पण आता मला माझे नाव लपविण्याची गरज भासणार नाही. मी शुभम(हिंदू) नसून शेख(मुस्लिम) असल्याचे आता सर्वांना सांगू शकतो’, असे अन्सर शेख म्हणाला. हे सांगताना जुन्हा आठवणींनी त्याचे डोळे पाणावले होते.

माझ्या वडिलांनी तीन विवाह केले. वडिलांची दुसरी पत्नी ही माझी आई. घरात शिक्षणाचे वातावरण फारसे नव्हतेच. माझ्या लहान भावाला शाळेतून काढून टाकण्यात आले होते, तर माझ्या बहिणीचे लहान वयातच लग्न करून देण्यात आले. जेव्हा मी घरी फोन करून यूपीएससी परीक्षेत उत्तीर्ण झालो असून, भविष्यात मी आयपीएस अधिकारी होणार असल्याचे सांगताच घरच्यांना धक्का बसला, हे सांगताना तो गहिवरला होता. पण कष्टाचे फळ मिळाल्याचे समाधान देखील त्याच्या चेहऱयावर होते. आपल्या मित्रांसोबत आपल्या यशाचे छोटेखानी सेलिब्रेशन केल्यानंतर अन्सर शेख आपल्या घरी कुटुंबियांसोबत आनंद साजरा करण्यासाठी शेडगावला रवाना झाला आहे.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 11, 2016 12:34 pm

Web Title: upsc rank holder speaks his mind i am shaikh not shubham can tell everyone now
टॅग : Upsc
Next Stories
1 ‘यूपीएससी’त राज्यातील १०० उमेदवारांची निवड
2 जळताना जिवाच्या आकांताने तो ओरडत राहिला पण जमाव चित्रीकरणातच मग्न होता..
3 सोप्या भाषेतून गुंतवणुकीचे मर्म उलगडले
Just Now!
X