पुणे शहराच्या वाहतुकीचे प्रश्न सोडविण्यासाठी वाहतूक पोलिसांनी तयार केलेल्या ‘व्हिजन डॉक्युमेन्ट’ मधील काही मागण्या महापालिकेने मान्य केल्या आहेत. त्यानुसार शहरात नवीन बारा सिग्नल देण्यात येणार आहेत. मागणी केलेल्या काही रस्त्यांवर उंच रस्ता दुभाजक बसविले जाणार आहेत. त्यामुळे वाहतूक कोंडी सोडविण्यास त्याची मदत होणार आहे.
शहर वाहतूक पोलिसांनी वाहतुकीच्या प्रश्नासंदर्भात व्हिजन डॉक्युमेन्ट तयार केले आहे. ते पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेला दोन महिन्यांपूर्वीच देण्यात आले आहे. त्यानंतर वाहतूक शाखेचे उपायुक्त सारंग आवाड, पुणे महापालिका आयुक्त व इतर अधिकाऱ्यांची बैठक झाली. त्या वेळी या व्हिजन डॉक्युमेन्टवर चर्चा झाली. यामध्ये केलेल्या अनेक मागण्यांवर सकारात्मक चर्चा होऊन त्या मान्य करण्याचे आयुक्तांनी मान्य केले.
वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी शहरात आणखी २५ नवीन सिग्नल सुरू करण्याची मागणी व्हिजन डॉक्युमेन्टमध्ये करण्यात आली होती. त्यानुसार पहिल्या टप्प्यात १२ नवीन सिग्नल सुरू करण्यास पालिकेने मान्यता दिली आहे. तसेच, अनेक रस्त्यावर रस्ता दुभाजकाची उंची कमी असल्यामुळे नागरिक कोठूनही रस्ता ओलांडतात. त्यामुळे वाहतूक कोंडीत भर तर पडतेच, पण त्यामुळे अपघातही घडतात. त्यामुळे अशा रस्ता दुभाजकांची उंची वाढविण्याची मागणी करण्यात आली होती. त्यानुसार आळंदी रस्ता ते कारागृह रस्ता असा दोन किलोमीटरच्या रस्त्यावरील रस्ता दुभाजकाची उंची वाढविण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. तसेच, नळस्टॉप ते पौड फाटा दरम्यानही नागरिक कोठूनही रस्ता ओलांडत असल्याचे दिसून आल्यामुळे या रस्ता दुभाजकासाठी लोखंडी रेलिंग टाकण्यात येणार आहेत. चांदणी चौक ते पाषाणकडे येणाऱ्या रस्त्यावरही रस्ता दुभाजकाची उंची वाढविली जाणार आहे, अशी माहिती वाहतूक पोलिसांनी दिली.
शहरातील काही महत्त्वाचे (चौक डेव्हलमेन्ट) चौक विकासाच्या मुद्दय़ावर देखील या बैठकीत चर्चा झाली. त्यानुसार कात्रज, खडीमशिन, बोपोडी, विद्यापीठ चौक, मुंढवा चौक अशा काही चौकांचा विकास करून त्या ठिकाणची वाहतूक कोंडी कशी कमी केली जाईल, याची माहिती देण्यात आली आहे. त्यानुसार चौकाचा विकास करण्यास सुद्धा सकारात्मक निर्णय या वेळी घेण्यात आला. त्यामुळे चौकातील वाहतूक सुरळीत होण्यास मदत होणार आहे. या बैठकीत वाहतुकीच्या अनेक प्रश्नांवर चर्चा झाली. त्यामध्ये सकारात्मक निर्णय घेण्यात आले आहेत, असे पोलिसांनी सांगितले.
डीपी रस्त्यावर टाकणार रस्ता दुभाजक
म्हात्रे पुलाजवळील डीपी रस्त्यावर दोन्ही बाजूने अस्ताव्यस्त वाहने लावली जातात. त्यामुळे या ठिकाणी मोठय़ा प्रमाणात वाहतूक कोंडी होती. या रस्त्यावर असलेल्या मंगलकार्यालयात आणि लॉन्सवर येणारे नागरिक रस्त्याच्या मधून रस्ता ओलांडतात. त्यामुळे वाहतूक कोंडीत भरच पडते. त्यामुळे या रस्त्यावर रस्ता दुभाजक टाकण्याचा वाहतूक पोलिसांनी महापालिकेला प्रस्ताव दिला होता. त्यानुसार आता या रस्त्यावर रस्ता दुभाजक टाकण्यात येणार आहे, अशी माहिती वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त सारंग आवाड यांनी दिली.