पिंपरी-चिंचवडकरांना सोमवारपासून दिवसाआड पाणीपुरवठा होणार आहे, अशी माहिती महानगरपालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. पाणीपुरवठा करणाऱ्या पवना धरणात ९९ टक्के पाणी साठा असूनही पाणी कपातीची कुऱ्हाड नागरिकांवर उगारली जात असल्यामुळे नागरिकांमध्ये नाराजी पाहायला मिळत आहे.

मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी धरणक्षेत्रात मोठ्या प्रमाणावर पाऊस झाला आहे. पिंपरी-चिंचवड शहराला पाणी पुरवठा करणारे पवना धरण तुडुंब भरलेले असताना पाणीकपात केली जात आहे. २५ नोव्हेंबरपासून शहरातील नागरिकांना दिवसाआड पाणीपुरवठा केला जाणार आहे. महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी शहराच्या लोकसंख्येचे कारण देत ही पाणीकपात केल्याचे सांगितले आहे. सध्या शहराची लोकसंख्या २७ लाख आहे, त्यानुसार नियमीत पाणीपुरवठा केल्यास पाण्याची टंचाई भासू शकते, असे आयुक्त हर्डीकर म्हणाले आहेत. तसेच, समन्यायी पाणीवाटप व्हावे म्हणून दिवसाआड पाणीपुरवठ्याची अंमलबजावणी करण्यात येणार असल्याचे देखील त्यांनी स्पष्ट केले आहे.

दरम्यान, दिवसाआड पाणीपुरवठा दोन महिन्यांसाठी लागू असणार असून, यामध्ये सुधारणा न झाल्यास संबंधित पाणी पुरवठा विभागाला जबाबदार धरले जाणार आहे. मागील काही दिवसांपासून शहरातील अनेक भागात पाणी कमी दाबाने येत असल्याची ओरड नागरिकांमध्ये आहे. त्यात आता दिवसाआड पाणीपुरवठा होणार असल्याने यात आणखीच भर पडली आहे. शहराची लोकसंख्या २७ लाख आहे, शहराला दिवसाला ५०० एमएलडी पाणी लागते, तर अधिकृत नळजोडणी ही १ लाख आहे. हे सर्व पाहता ३८ ते ४० टक्के पाण्याची तूट होते, हे भरून काढण्यासाठी दिवसाला किमान ६०० एमएलडी पाणी द्यावे लागेल असे आयुक्त म्हणाले.

अनाधिकृत नळजोडणी असेल तर तातडीने शुल्क आकारून ती अधिकृत करण्यात येईल, पैसे भरत नसतील तर हप्ते पाडून देण्यात येतील असेही आयुक्त म्हणाले. दरम्यान, खासगी टँकर लॉबीने मनपाचे पाणी चोरल्यास त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचाही आयुक्तांनी इशारा दिला आहे. मात्र, या पाणी कपातीमुळे सर्वसामान्य जनता नाराज आहे.